11th Admission 2025 | अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचा फज्जा  File Photo
सातारा

11th Admission 2025 | अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचा फज्जा

तांत्रिक अडचणीमुळे संकेतस्थळ बंद : विद्यार्थी व पालकांमध्ये नाराजी

पुढारी वृत्तसेवा

सातारा : इयत्ता अकरावीसाठी केंद्रीभूत ऑनलाईन पध्दतीने राबवण्यात येणार्‍या प्रवेशप्रक्रियेचा पहिल्याच दिवशी फज्जा उडाला आहे. तांत्रिक अडणीमुळे अधिकृत संंकेतस्थळ बंद झाल्याने विद्यार्थी व पालकांना महाविद्यालयातून आल्या पावली परतावे लागले. सुलभतेच्या कारणास्तर राबवण्यात येणार्‍या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या अंमलबजावणीमधील त्रुटींबाबत विद्यार्थी व पालकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

यावर्षी पहिल्यांदाच अकारावीची कला, वाणिज्य व विज्ञान विद्याशाखांसाठीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने केंद्रीभूत स्तरावर राबवण्यात येत आहे. त्यासाठी दि. 21 मे रोजी सकाळी 11 ते दि. 28 मे रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत प्रत्यक्ष नोंदणी व 1 ते 10 पर्यंत कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदवणे, असे वेळापत्र जाहीर करण्यात आले. वेळापत्रकानुसार दि. 21 ते 28 मेदरम्यान ऑनलाईन प्रवेश नोंदणी करण्यात येणार आहे. या वेळापत्रकानुसार इयत्ता अकरावीच्या ऑनलाईन रजिस्ट्रेशनला प्रारंभ झाला होता.

मागील दोन दिवस डेमो रजिस्ट्रेशन करण्यात आले. डेमो रजिस्ट्रेशन कायम राहील का नाही याबाबत महाविद्यालये व विद्यार्थ्यांना काहीच कल्पना नव्हती. त्यामुळे या सर्व पालकांना महाविद्यालयांकडून फोन करुन बुधवारी रजिस्ट्रेशनसाठी बोलावण्यात आले होते. बुधवारी सकाळपासूनच संकेतस्थळ सुरु होत नव्हते. तांत्रिक अडचणीमुळे संकेतस्थळ बंद असल्याचे शिक्षणाधिकार्‍यांनी महाविद्यालयांना मेसेज पाठवण्यात आले होते.

मात्र विद्यार्थी पालक याबाबत अनभिज्ञ होते. काही महाविद्यालय व्यवस्थापनांनाही याची कल्पना नव्हती. त्यामुळे काही कनिष्ठ महाविद्यालयांनी संकेतस्थळ सुरु होईल या आशेवर विद्यार्थी पालकांना थांबवून ठेवले होते. त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. त्यातच भर दुपारी मुसळधार पाऊस सुरु झाल्याने त्यात आणखीच भर पडली. शिक्षण संचलनालयाच्यावतीने संकेतस्थळावरील तांत्रिक दुरुस्तीचे काम युध्द पातळीवर सुरु आहे. संकेस्थळ बंद असल्याने अकरावी अ‍ॅडमिशन प्रक्रिया खोळंबणार आहे. ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी फज्जा उडाल्याने विद्यार्थी व पालकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

यावर्षीपासून अकरावी प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाईन पध्दतीने सुरु केली आहे. ही बाब चागंली आहे. परंतू सर्वर डाऊन, तांत्रिक अडचणींमुळे प्रक्रिया सुरुच झाली नाही. शासनाने ही बाब गांभिर्याने घेणे आवश्यक आहे. उपक्रम चांगला पण योग्य नियोजन नसल्याने विद्यार्थी व पालकांना मनस्ताप होत आहे. कोणताही उपक्रम नव्याने सुरु करताना अडचणी येतात. त्यामुळे तो परिपूर्ण आहे का याची चाचणी घेवून मगच तो सुरु करावा.
-राजेंद्र चोरगे, गुरुकुल स्कूल संस्थापक.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT