सातारा; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम सुरू असल्याने अनेक धोकादायक ठिकाणे बनली आहेत. महामार्गावर जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत तब्बल 116 बळी गेले असून अनेकजण जायबंदी झाले आहेत. सहापदरीकरणाच्या कामातील दिरंगाई व गलथान कारभारामुळे अनेकांचा बळी गेला आहे. महामार्ग प्राधिकरण तसेच प्रशासनाने अपघातांची जबाबदारी घेऊन अपघात होऊ नये यासाठी आता ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.
ज्या ठिकाणी सहापदरीकरणाचे काम सुरू आहे त्या ठिकाणी सुसज्ज 108 रुग्णवाहिकांची संख्या वाढवण्याची गरज आहे. अनेकदा याच ठिकाणी अपघात झालेले आहेत. अपघातग्रस्त जखमींना वेळेवर मदत पोहोचण्यासाठी रुग्णवाहिका तातडीने उपलब्ध होणे गरजेचे आहे.
रात्रीच्यावेळी अधिक दुर्घटना…
सहापदरीकरण सुरु असलेल्या ठिकाणी अरुंद रस्त्यांतून दुचाकी, चारचाकी व अवजड वाहने मार्ग काढत असतात, कोणतीही मार्गिका नसल्यामुळे वाहनांच्या रांगातून अनेक जण नियम धाब्यावर बसवून वाहने दामटण्याचा प्रयत्न करतात. तसेच रात्रीच्या वेळी रिफ्लेक्टर नसल्यामुळे आजूबाजूच्या वाहनांचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढते.
दुरूस्तीची कामेही उठलीत जीवावर…
- सातारा ते कागल दरम्यानच्या 133 किमी राष्ट्रीय महामार्गाचे काम दोन टप्प्यांत होत आहे. त्यामध्ये शेंद्रे, ता. सातारा ते पेठ नाका हा 73.5 किलो मीटरचा एक टप्पा आहे. या कामांतर्गत ठिकठिकाणी मोठे खोदकाम झाले आहे. उंब्रजनजीक तर महामार्गावर रस्त्याकडेला सिमेंटच्या ब्लॉक्सवर उभ्या लोखंडी सळ्या दिसत आहेत. या ठिकाणी अपघात झाल्यास जीवित हानीची शक्यता आहे.
- उंब्रज ते तासवडे टोलनाक्यादरम्यान उड्डाणपूल पाडून नव्याने पुलाचे काम सुरू केले होते. या काळात वाहनचालकांचे मोठे हाल झाले. ते काम पूर्ण होतेय तोवर कराड येथील अवघ्या 19 वर्षांपूर्वीचा उड्डाणपूल पाडण्यात आला. यामुळे पुन्हा वाहनांची प्रचंड कोंडी, धुळीचे साम्राज्य अन् धोकादायक प्रवास चालकांना सहन करावा लागत आहे.
- महामार्गावर दुरुस्तीची कामे सुरू असताना अपघाताचे धोकेही वाढले आहेत. परंतु, आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत नसल्यामुळे अनेक अपघात होऊन जीवित हानी झाली आहे.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.