Sanjay Raut Pudhari
महाराष्ट्र

Sanjay Raut: ‘Enough is Enough’, संजय राऊतांचा संताप; बातमीवर कायदेशीर कारवाईचा इशारा, वाद पेटण्याची शक्यता

Sanjay Raut Legal Warning: संजय राऊत यांनी UBT खासदारांच्या कथित बैठकीच्या बातम्यांवर तीव्र प्रतिक्रिया दिली. या वृत्तांना खोटे ठरवत त्यांनी कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Sanjay Raut Legal Warning: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुप्त बैठक झाल्याच्या वृत्तावरून राजकीय वातावरण तापले आहे. या संदर्भात आलेल्या बातमीवर तीव्र प्रतिक्रिया देत शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला आणि पत्रकारांना थेट कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्रात असा दावा करण्यात आला होता की, शिवसेनचे (UBT) काही खासदार शिंदे गटात जाण्याच्या तयारीत आहेत आणि यासाठी गुप्त बैठकही पार पडली. मात्र या बातमीवर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली.

“या वृत्तपत्राने आणि बातमीदाराने कायदेशीर कारवाईची तयारी ठेवावी. यापुढे अशा गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत. Enough is enough,” असा इशारा राऊत यांनी दिला. त्यांनी ही बातमी पूर्णपणे खोटी आणि दिशाभूल करणारी असल्याचेही सांगितले.

दरम्यान, या कथित बैठकीबाबत संबंधित खासदारांकडूनही वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. काहींनी अशी कोणतीही बैठक झालेली नसल्याचे सांगितले आहे, तर काहींनी यावर मौन बाळगले आहे. त्यामुळे या प्रकरणाभोवती आणखी गोंधळ निर्माण झाला आहे.

राजकीय वर्तुळात मात्र या घडामोडींमुळे चर्चेला उधाण आले आहे. मात्र, सध्या तरी शिवसेने (UBT) कडून ही बातमी फेटाळण्यात येत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी दिलेला कायदेशीर कारवाईचा इशारा महत्त्वाचा मानला जात आहे.

यामुळे माध्यमांच्या जबाबदारीचा मुद्दाही पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आगामी काळात या प्रकरणात नेमक्या कोणत्या घडामोडी घडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT