Sanjay Raut on Delimitation Bill: डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्याच्या मुद्द्यावरून विरोधकांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने या विधेयकाला पाठिंबा दर्शवल्याचे वृत्त समोर आल्यानंतर इंडिया आघाडीत नाराजीचे वातावरण आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी विधेयकाच्या समर्थनार्थ भूमिका मांडली. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी सावध भूमिका घेतली. विशेष म्हणजे, इंडिया आघाडीच्या बैठकीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा एकही खासदार उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
माध्यमांशी बोलताना राऊत यांनी डिलिमिटेशन विधेयकावरून केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले. हे विधेयक लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचे सांगत त्यांनी भाजपवर निशाणा साधला. ५४३ खासदारांची संख्या वाढवून ८६० करण्याचा आणि मतदारसंघांची पुनर्रचना आपल्या सोयीनुसार करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला. यामुळे देशाची संघराज्य व्यवस्था आणि लोकशाही कमकुवत होईल, असेही ते म्हणाले.
‘देशाच्या लोकशाहीची ही अखेरची धोक्याची घंटा’
डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्याचा निर्णय राष्ट्रवादीने खरोखर घेतला असेल, तर तो महाराष्ट्राच्या भविष्यासाठी दुर्दैवी असल्याचे राऊत म्हणाले. फुले, शाहू, आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या पक्षाने अशी भूमिका घेऊ नये, असेही त्यांनी सुनावले.
“शाहांनी आणि मोदींनी शरद पवारांचा पक्ष फोडला, कुटुंब फोडलं. अशा परिस्थितीत त्यांच्याच बाजूने उभे राहणे म्हणजे स्वाभिमान गहाण ठेवण्यासारखे आहे,” अशा शब्दांत राऊत यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीका केली. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्यावरील कारवाईचा उल्लेख करत त्यांनी भाजपवरही निशाणा साधला.
‘इंडिया आघाडीत स्थान राहणार नाही’
राष्ट्रवादीचे खासदार इंडिया आघाडीच्या बैठकीला जाणार नसल्याच्या वृत्तावर प्रतिक्रिया देताना राऊत यांनी नाराजी व्यक्त केली. “तुम्ही जर भाजप आणि अमित शाह यांच्या बाजूने भूमिका घेणार असाल, तर तुम्हाला महाविकास आघाडी आणि इंडिया ब्लॉकमध्ये स्थान राहणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला.
शरद पवार यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे ते सध्या कोणताही निर्णय घेण्याच्या स्थितीत नसल्याचेही राऊत म्हणाले. त्यांच्या सहकाऱ्यांनी मात्र त्यांच्या विचारधारेचा वारसा जपण्याची जबाबदारी पार पाडली नाही, अशी टीका त्यांनी केली. सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि इतर खासदारांनी या विषयावर स्पष्ट भूमिका मांडावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
‘पक्षापेक्षा देश आणि महाराष्ट्र महत्त्वाचा’
पक्ष फुटण्याच्या भीतीने भूमिका बदलू नये, असे सांगताना राऊत म्हणाले, “आमदार, खासदार येतील आणि जातील. पक्ष फुटतील, पक्ष उभे राहतील. पण देश आणि महाराष्ट्र महत्त्वाचा आहे. विचारधारा महत्त्वाची आहे.” आमचा पक्ष फुटेल, असं सुप्रिया सुळे म्हणाल्याचा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला आहे.
याशिवाय, डिलिमिटेशन विधेयकाच्या समर्थनार्थ मतदान करण्यासाठी खासदारांना १५० कोटी रुपयांची ऑफर दिली जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. राष्ट्रवादीच्या खासदारांनी सदसद्विवेकबुद्धीने मतदान करावे, असे आवाहन करत त्यांनी इशारा दिला की, महाराष्ट्राच्या विरोधात मतदान करणाऱ्या खासदारांना जनता पुन्हा निवडून देणार नाही.
“महाराष्ट्राशी झालेली बेईमानी मराठी माणूस सहन करणार नाही,” असे म्हणत राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे डिलिमिटेशन विधेयकावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीची भूमिका आणि इंडिया आघाडीतील पुढील राजकीय घडामोडींकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.