सांगली

सांगलीत विविध संप्रदायांची परंपरा ८६ वर्षांपासून चित्ररूपात जतन

दिनेश चोरगे

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  कृष्णेच्या काठावर वसलेली सांगलीनगरी आपल्या पोटात अलौकिक खजिने घेऊन उभी आहे. या खजिन्यामधला भारतभरातल्या विविध संप्रदायांच्या प्राचीन परंपरांचा एक धागा 'कैवल्यधाम'पर्यंत आला आहे. ८६ वर्षांपासून या वास्तूने चित्रांच्या माध्यमातून तो जपला आहे.

सांगलीनगरीच्या गणेश मंदिराचे बांधकाम करणाऱ्या कारागिरांच्या सहकार्याने प. पू. तात्यासाहेब कोटणीस महाराज यांनी याच नगरीत १९३७ साली 'कैवल्यधाम' उभे केले. कोटणीस महाराजांची पाचवी पिढी आज या 'कैवल्यधाम'मध्ये नांदते आहे. ही पिढी इथं नुसतीच राहत नाही, तर या 'कैवल्यधाम' मधल्या लाखमोलाच्या चित्रांचा खजिना जिवापाड जपते आहे. विविध धार्मिक संप्रदायांचा मन:पूर्वक अभ्यास करणाऱ्यांसाठी, प्राचीन वास्तुकला शिकणाऱ्या नव्या पिढीसाठी, चित्रकार- शिल्पकार – साहित्यिक-विचारवंत- धर्माभ्यासकांसाठी सांगलीचे 'कैवल्यधाम' एखाद्या विद्यापीठाहून कमी नाही.

डिजिटलायजेशन

गुरुनाथ कोटणीस महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली संजय आणि धनंजय कोटणीस हे या खजिन्याची काळजी घेतात. या फोटोंचे आता डिजिटलायजेशनचे काम सुरू करण्यात येणार असून प्रत्येक फोटोला स्वतंत्र क्यूआर कोड देण्यात येणार आहे. जेणेकरून अभ्यासकांना फोटोसोबत माहितीही मिळेल, अशी माहिती संजय कोटणीस यांनी दिली.

खजिन्यात आहे काय ?

दत्त सांप्रदाय, वारकरी सांप्रदाय, चिमड सांप्रदाय, समर्थ संप्रदायांमधील जे जे मोठे संत होऊन गेले त्या साऱ्यांची चित्रे काचेच्या फ्रेममध्ये 'कैवल्यधाम'मध्ये लावण्यात आली आहेत. ८६ वर्षांपूर्वी मारुतीराव देवळेकर यांनी एकट्यांनी पावडर शेडिंगमध्ये ही चित्रे रेखाटली होती आणि त्यासाठी परदेशातून बोन पावडर मागवण्यात आली होती. दोन बाय तीन फुटांच्या अशा ३०० हूनही जास्त प्रतिमांची मांडणीही संप्रदायांनुसार केली आहे. अंबाबाई, व्यंकटेश, बनशंकरी, तुळजाभवानी, बिराडसिद्ध, तिरुपती यांच्यासह सर्व संप्रदायातील संतांची अगदी प्राचीन चित्रे या खजिन्यात आहेत. शिवाय, सांगली संस्थानचे मूळपुरुष हरभटजी पटवर्धन, चिंतामणराव पटवर्धन, राजवैद्य आबासाहेब सांभारे, राजकवी साधुदास, माणिकप्रभू महाराज, अक्कलकोट स्वामी समर्थ रामदास, विवेकानंद, रामकृष्ण परमहंस, श्रीधर महाराज यांची अगदी दुर्मीळ चित्रे खजिन्यात आहेत. यातील काही जणांचे फोटो त्यांच्या मूळ घरातही नाहीत, जे इथे आहेत.

चित्रांच्या या खजिन्यासोबत 'कैवल्यधाम'मध्ये तब्बल १० हजार अत्यंत दुर्मीळ धार्मिक ग्रंथांचे ग्रंथालय आहेच, शिवाय अत्यंत प्राचीन वस्तूंचे संग्रहालयही आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT