सांगली

सांगलीत पोलिस दलातर्फे मॅरेथॉन; स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव

अमृता चौगुले

सांगली; पुढारी वृत्तसेवा : भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा पोलिस दलातर्फे रविवारी सकाळी मॅरेथॉन रॅली काढण्यात आली. जिल्ह्यातील पोलिस अधिकारी, कर्मचारी तसेच सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते.

जिल्हा पोलिसप्रमुख दीक्षित गेडाम यांनी झेंडा दाखविल्यानंतर पोलिस मुख्यालयापासून मॅरेथॉनला सुरुवात झाली. अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख मनीषा दुबुले, पोलिस उपअधीक्षक अशोक वीरकर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकारी उपस्थित होते.

गृहरक्षक दलाचे चारशे जवान तसेच चारशेहून अधिक ज्येष्ठ नागरिक व महिला मॅरेथॉनमध्ये सहभागी झाल्या होत्या. जिल्ह्यातील 25 पोलिस ठाण्यातील प्रत्येक पाच पोलिस सहभागी झाले होते. पोलिस बँड व शासकीय रुग्णवाहिका, तसेच पोलिस व्हॅनही सहभागी झाल्या होत्या. विश्रामबाग चौक, आलदर चौक, आमदार सुधीर गाडगीळ यांचे कार्यालय व विलिंग्डन महाविद्यालय या मार्गावरून ही मॅरेथॉन निघाली. देशाच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या. पोलिस मुख्यालयाजवळ तिचा समारोप करण्यात आला.

दरम्यान, पोलिस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर सोमवारी सकाळी ध्वजारोहण आहे. जिल्ह्यातील पोलिस ठाणे तसेच पोलिस चौक्यांचा परिसरही सुशोभीकरण करण्यात आला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT