सांगली : उध्दव पाटील : खोक्यांची नगरी अशी सांगलीची ख्याती बनली होती. मात्र, अनधिकृत खोक्यांची जप्ती आणि अधिकृत खोक्यांचे पुनर्वसन त्यामुळे खोक्यांची समस्या कमी झाली. मात्र, अलीकडे अनधिकृत खोकी, स्टॉल जागोजागी, रस्तोरस्ती पुन्हा दिसू लागले आहेत. शहराला खोक्यांच्या 'कॅन्सर'ची पुन्हा लागण होऊ लागली आहे. शहराच्या बकालपणात आणि रस्ते वाहतुकीच्या अडथळ्यात भर पडते आहे. मात्र, संबंधित यंत्रणांना त्याचे काहीच सोयरसूतक दिसत नाही.
सांगलीत सन 2008 मध्ये 81व्या मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आल्या होत्या. त्यानिमित्ताने शहरातील अनेक ठिकाणची खोकी हटवली होती. त्यापैकी बर्याच खोक्यांचे अन्यत्र पुनर्वसन झाले. दरम्यान, सन 2008 पूर्वीही अनधिकृत खोक्यांविरोधात पालिका प्रशासनाने मोहीम राबविली होती. खोकी हटवल्याने शहराचा बकालपणा कमी झाला. रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला. मात्र, आता पुन्हा रस्त्याकडेला खोकी, स्टॉल्सचा डेरा पडू लागला आहे.
कोल्हापूर रोड, शास्त्री चौक, शंभरफुटी रस्ता, आखाडा परिसर, सांगली-मिरज रस्ता, संजयनगर, माधवनगर रोड, विश्रामबाग उड्डाणपुलाखाली तसेच महापालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी अनधिकृत खोक्यांचीभर पडली आहे. दिवसेंदिवस अनधिकृत खोक्यांची संख्या वाढते आहे.
खोकी, स्टॉल रस्त्याकडेला लावले जातात. पण, या खोक्यांचा सारा पसारा रस्त्यावर आलेला असतो. ग्राहकांची वाहने रस्त्यावर उभी असतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होतो. अनधिकृत खोकी, स्टॉल्स हटवणे व हटवलेल्या अधिकृत खोक्यांचे पुनर्वसन करणे यादृष्टीने पावले पडताना दिसत नाहीत.
महापालिका क्षेत्रातील अधिकृत 1 हजार 400 खोक्यांचे पुनर्वसन झालेले आहे. सांगलीत 36 ठिकाणी 1 हजार 167 खोक्यांचे, कुपवाडमध्ये 35 खोक्यांचे, मिरजेत 11 ठिकाणी 198 खोक्यांचे पुनर्वसन झाले आहे. 2 हजार 136 खोक्यांचे पुनर्वसन रखडले आहे.
शक्य तिथे पक्के बांधकाम करून खोक्याचे पुनर्वसन करणे अथवा वाहतुकीस अडथळा न होणार्या जागा, खुल्या जागा, आरक्षित परंतु त्याचा विकास आरक्षणाप्रमाणे नजीकच्या काळात करता येणार नाही, अशा जागांवर मुव्हेबल खोके ठेवण्यास परवानगीचा महासभेचा ठराव दि. 20 जानेवारी 2005 मध्ये झालेला आहे. त्यानुसार कार्यवाही केल्यास रखडलेल्या खोकी पुनर्वसनाला गती येईल.
गणेश कोडते, खोकीधारक संघटना.