सांगली

सांगलीची हवा धोक्याच्या सीमारेषेवर

मोहन कारंडे

सांगली; उद्धव पाटील : सांगलीच्या पाण्याची 'महती'सर्वदूर पसरलेली आहे. आता त्यात हवेचीही भर पडत आहे. धुलिकण व अन्य सूक्ष्मकणांमुळे सांगलीची हवा धोक्याच्या सीमारेषेवर आली आहे. कुपवाड एमआयडीसी परिसरात तर धोका अधिक आहे. दमा, सीओपीडी, श्वासनलिकांच्या आजारांची शक्यता वाढली आहे. आजारी व्यक्तींना धोका अधिक आहे, पण आजार नसलेल्या नागरिकांनाही आजार उद्भवू शकतो. परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वीच हवेचे प्रदूषण रोखण्याची गरज आहे.

महानगरपालिका क्षेत्रात पाच ठिकाणी हवा गुणवत्ता निरीक्षण केंद्र आहेत. सांगलीत महापालिका मुख्यालय परिसर, उद्योग भवन, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच मिरजेत महापालिका कार्यालय व कुपवाडमध्ये एमआयडीसी परिसरात हवा गुणवत्ता निरीक्षण केंद्र आहे. याठिकाणी हवेतील प्रदूषणाची पातळी तपासली जाते. केंद्राच्या पर्यावरण व वने मंत्रालयाच्या मान्यताप्राप्त संस्थेकडून महिन्यातून एकदा चोवीस तासाच्या कालावधीतील हवेच्या गुणवत्तेचे मापन केले जाते. हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी महापालिकेने त्रयस्त संस्था नियुक्त केली आहे. पीएम-10 (पार्टीक्युलेट मॅटर), पीएम-2.5, सल्फर डायऑक्साईड व नायट्रोजन डायऑक्साईड हे चार निकषावर हवेची गुणवत्ता पाहिली जाते. 'पीएम-10' या धुलिकणांचा आकार दहा मायक्रोमीटर किंवा त्यापेक्षा कमी व्यासाचा असतो. त्यात धूळ, घाण, धातुचे सूक्ष्म कण, जीवाणू, बुरशी, वाहनांमधून बाहेर पडणार्‍या धुरातील कणांचा समावेश असतो. घनरुप कण, त्यांना चिकटलेले वायू असू शकतात. त्यांचे रासायनिक स्वरूप काहीही असू शकते. मानवी केसाचा व्यास साधारणत: 70 मायक्रोमीटर (मायक्रॉन) असतो. 'पीएम-10' मधील धुलिकण नाकातील केसांच्या फिल्टरमध्ये न अडकता ते थेट श्वासनलिकेत जातात. 'पीएम-2.5' यामधील कणांचा व्यास 2.5 मायक्रोमीटर किंवा त्याहून कमी असतो. हे धुलिकण अधिक धोकादायक असतात. कारण हे सूक्ष्म धुलिकण थेट वायुकोषापर्यंत जातात.

'पीएम-10'ची हवेतील सामान्य पातळी 100 मायक्रोग्रॅम घनमीटर आहे. ही पातळी 101 ते 250 पर्यंत असेल तर धुलिकणांमुळे हवेचे प्रदूषण झाल्याचे, तर 251 ते 350 मायक्रोग्रॅम घनमीटर असेल तर धुलिकणांमुळे हवेचे प्रदूषण अधिक झाल्याचे स्पष्ट होते. सांगलीत महापालिका मुख्यालय परिसरात जानेवारी 2022 मध्ये ही पातळी 285 मायक्रोग्रॅम इतकी होती. फेब्रुवारीत 156 मायक्रोग्रम, मार्चमध्ये 190 मायक्रोग्रॅम, एप्रिलमध्ये 100 मायक्रोग्रॅम, मे मध्ये 97 मायक्रोग्रॅम इतकी होती. पावसाळ्यात पावसाच्या पाण्याबरोबर धुलिकण खाली जमिनीवर येतात. त्यामुळे पावसाळ्यात हवेची गुणवत्ता चांगली असते. परिणामी 'पीएम-10'ची पातळी जूनमध्ये 68, जुलैमध्ये 64, आणि ऑगस्टमध्ये 54 मायक्रोग्रॅम इतकी नोंदली आहे.

'पीएम-2.5'ची सामान्य पातळी 60 मायक्रोग्रॅम इतकी आहे. ही पातळी 61 ते 90 पर्यंत असल्यास ती प्रदूषित असते. हवेची गुणवत्ता बिघडल्याचे ते दर्शक आहे. 'पीएम-2.5'ची पातळी 91 ते 120 पर्यंत असल्यास तीव्र प्रदूषण झाल्याचे समजावे. सांगलीत महापालिका मुख्यालय परिसरात जानेवारी 2022 मध्ये 'पीएम-2.5'ची पातळी 85 मायक्रोग्रॅम, फेब्रुवारीत 88, मार्चमध्ये 105, एप्रिलमध्ये 95, मे मध्ये 84 मायक्रोग्रम होती. जुन, जुलै आणि ऑगस्टमध्ये 32 ते 25 मायक्रोग्रॅम इतकी नोंदली आहे. ही पातळी कमी होण्याचे कारण पाऊस हे आहे.

एनओटू प्रदूषण पातळीजवळ; एसओटू सेफ झोन

नायट्रोजन डायऑक्साईडची सामान्य पातळी 80 पर्यंत आहे. महापालिका मुख्यालय परिसर व उद्योग भवन येथील नायट्रोजन डायऑक्साईडचे प्रमाण जानेवारी ते मार्च 2022 या कालावधीत 63 ते 65 दरम्यान होते. म्हणजेच नायट्रोजन डायऑक्साईडचे प्रमाण प्रदूषण पातळीच्या जवळ आले आहे. सल्फर डायऑक्साईडचे प्रमाण 'सेफ झोन'मध्ये असल्याची नोंद दिसत आहे.

मशिन गच्चीवर…!

हवेच्या गुणवत्तेचे निरीक्षण करणारे मशिन इमारतीच्या गच्चीवर बसवलेले आहे. हे मशिन जमिनीपासून सहा-सात फूट उंचीवर असते तर पीएम-10 व पीएम-2.5 ची पातळी कदाचित जास्त आढळली असती. रस्त्यावरून वाहने गेल्यानंतर उडालेला धुरळा आणि धूर या मशिनच्या कक्षेच्या उंचीपर्यंत गेला नसेल तर त्याचे मापन कसे होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

स्वच्छ हवेच्या गुणात्मक क्रमवारीत या आठवड्यात आपला देश 171 व्या क्रमांकावर आहे. त्यावरून देशाची, देशातील शहरांची स्थिती समजून येते. 'पीएम-10', पीएम-2.5'च्या प्रदूषित पातळीमुळे श्वसन संस्थेच्या आजारांचा धोका वाढला आहे. या कणांच्या प्रदूषित पातळीमुळे श्वासनलिकेचे आणि फुप्फुसांचे दीर्घकालीन विकार, वायुकोषांचे विकार होतात आणि वाढतात. सध्या इंटरस्टिशिअल लंग्ज डिसिज वाढले आहेत. धुलिकणांच्या प्रदुषणामुळे फुप्फुसाच्या कॅन्सरच्या धोक्याची शक्यता वाढते. प्रदूषण रोखण्यासाठी शासनाने पावले उचलावीत. नागरिकांनीही सजग व्हावे. प्रदूषित भागातून जाताना मास्कचा वापर करावा.
– डॉ. आशिष अनिल मडके

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT