सांगली

सांगली : स्थायी सभापतिपदासाठी भाजपतर्फे धीरज सूर्यवंशी

मोहन कारंडे

सांगली; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदासाठी भाजपने 'वजनदार' उमेदवार निश्चित केला आहे. भाजपतर्फे माजी उपमहापौर धीरज सूर्यवंशी हे मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दरम्यान स्थायी समिती सभापतिपदासाठी राष्ट्रवादीने काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. काँग्रेसतर्फे संतोष पाटील व फिरोज पठाण हे दोन सदस्य उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

महापालिकेच्या स्थायी समितीत भाजपचे 9, काँग्रेसचे 4 व राष्ट्रवादीचे 3 सदस्य आहेत. स्थायी समितीत भाजपचे बहुमत आहे. मात्र, सदस्यगजानन आलदार यांचा सवतासुभा पाहता संभाव्य नाराजीचा लाभ विरोधकांना होऊ नये म्हणून भाजपने आलदर यांच्यासह 9 सदस्यांना चोख बंदोबस्तात महाबळेश्वर सहलीवर पाठवले होते. महाबळेश्वर येथे सोमवारी भाजपचे नेते व स्थायी समितीच्या 9 सदस्यांची बैठक झाली. आमदार सुधीर गाडगीळ, प्रदेश कार्यकारिणी सदस्य शेखर इनामदार, माजी आमदार दिनकर पाटील, सुरेश आवटी, सभागृह नेते तथा भाजप गटनेते विनायक सिंहासने उपस्थित होते. स्थायी समिती सभापतीपदाच्या उमेदवारीसाठी भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्याकडून धीरज सूर्यवंशी यांचे नाव शेखर इनामदार यांच्या मोबाईलवर आले. इनामदार यांनी हे नाव भाजपच्या स्थायी समितीच्या सर्व 9 सदस्यांसमोर जाहीर केले. मंगळवारी दुपारी बारा वाजण्याच्या दरम्यान भाजपतर्फे धीरज सूर्यवंशी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. सूर्यवंशी यांची विजय निश्चित मानला जात आहे. स्थायी समिती सभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत मंगळवारी दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी काँग्रेस व राष्ट्रवादीची महापालिकेत बैठक झाली. स्थायी समितीत राष्ट्रवादीचे 3 सदस्य आहेत. राष्ट्रवादीने बोलवलेल्या बैठकीला संगीता हारगे, डॉ. नर्गिस सय्यद या दोन सदस्या उपस्थित होत्या. राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान म्हणाले, पवित्रा केरीपाळे या काही कारणामुळे बैठकीला उपस्थित राहू शकल्या नाहीत. त्यांचे चिरंजीव उपस्थित होते. राष्ट्रवादीची तीनही मते काँग्रेस उमेदवाराला मिळतील.

बागवान म्हणाले, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यांच्या आदेशानुसार स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने काँग्रेसला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. तशी माहिती काँग्रेसचे गटनेते संजय मेंढे यांना दिली आहे. काँग्रेसचे गटनेते मेंढे यांनी काँग्रेसच्या स्थायी समिती सदस्यांची बैठक घेतली. काँग्रेसकडून संतोष पाटील व फिरोज पठाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. उमेदवारीवरून भाजपमध्ये नाराजी उफाळेल व त्याला लाभ होईल, या आशेवर काँग्रेस आहे. आलदर यांनी खळबळ उडवली; मात्र उमेदवारी ठरल्यानुसारच स्थायी समिती सभापतीपदासाठी भाजपचे धीरज सूर्यवंशी, अ‍ॅड. स्वाती शिंदे, गजानन आलदर, संजय कुलकर्णी हे चार सदस्य प्रबळ इच्छूक होते. इच्छुकांच्या शर्यतीत धीरज सूर्यवंशी हे प्रथमपासून अग्रभागी होते. मात्र आलदर यांनी ऐनवेळी स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज नेऊन आणि नॉट रिचेबल होऊन भाजपमध्ये खळबळ उडवून दिली. पण भाजपने त्यांचा शोध घेतला. त्यांच्यासह सर्व नऊ सदस्यांना चोख बंदोबस्तात सहलीवर पाठवले. आलदर यांनी खळबळ उडवली, पण उमेदवारी मात्र ठरल्यानुसार धीरज सूर्यवंशी यांनाच जाहीर झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT