सांगली

सांगली : सोयाबीन उत्पादकांना 350 कोटींचा फटका

दिनेश चोरगे

सांगली; विवेक दाभोळे :  कमी दर, पावसाने घसरलेली प्रतवार आणि बाजारात होणारी लूट यातून जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकांना एका अंदाजानुसार जवळपास 350 कोटींच्या घरात फटका सहन करावा लागत आहे. यातून जिल्ह्याच्या अर्थकारणाला तर हादरा बसला आहे. याचवेळी सोयाबीनला गेल्या काही वर्षातील आतापर्यंतचा निच्चांकी दर मिळत आहे. बाजारात खुलेआम उत्पादकांची लूट होत आहे. तर अपवाद वगळता खरेदीदारांची मात्र दिवाळी होत आहे.

सोयाबीन हंगाम आता मध्यावर आला आहे. परतीच्या पावसाने तयार पिकाचे मोठेच नुकसान झाले आहे. तर काढणी सुरू असलेल्या सोयाबीनची प्रतवारी घसरली आहे. यातूनच खरेदीदार शेतकर्‍यांचे सोयाबीन खरेदी करताना 'मॉईश्चर'वर बोट ठेवत आहे. गेल्या दोन हंगामात सोयाबीनला उच्चांकी दर मिळाला होता. मात्र यावेळी दर जेमतेम 4500 ते 5000 च्या घरातच खेळत आहे. उसाच्या काटामारीची सातत्याने चर्चा होते. त्याच धर्तीवर आता 'मॉईश्चरमारी' तून सोयाबीन उत्पादकाचा पध्दतशीर 'कार्यक्रम' होत आहे. जाणकारांतून याला दुजोरा दिला जात आहे.

साधारणपणे सोयाबीनसाठी एकरी खर्च 17 ते 18 हजार रुपयांच्या घरात येतो. आता बहुतेक शेतकरी उसासाठी नांगरट, खुरटणी आणि सरी सोडलेल्या शेतात सोयाबीन सरीवर टोकतात. यामुळे हा खर्च सोयाबीनसाठी गृहित न धरता एकरी खर्च ढोबळमानाने मांडता येईल. याची आकडेवारी सोबतच्या चौकटीत दिली आहे.

यंदाही प्रामुख्याने मध्यप्रदेश या सोयाबीन उत्पादक पट्ट्यात पाऊस, कीटकांच्या हल्ल्यामुळे यंदा किमान 12 टक्के सोयाबीन उत्पादन घटण्याचा अंदाज आहे. परिणामी, दरात तेजी अपेक्षित होती. मात्र या तेजीला मॉईश्चरची 'नजर' लागली आहे. हवामान प्रतिकूल, विषाणूजन्य रोग, पिवळा मोझॅक यामुळे उतारा घटला आहे.

तेलबिया पिकांवर प्रक्रिया करणार्‍या उद्योजकांची सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडिया ही संस्था प्रामुख्याने उत्पादनाचा अंदाज निश्चित करते. त्यांचा दर तेजीचा अंंदाज होता. मात्र उत्पादन घटले तरी जादा दराच्या रुपाने त्याचा शेतकर्‍यांना लाभ झालेला दिसत नाही. तर याकडे मात्र शासन आणि लोकप्रतिनिधी देखील गांभीर्याने लक्ष देत नसल्याची टीका होते.

उत्पादकांचे दुहेरी नुकसान!

सांगली जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकांना यावेळी एकरी उतारा घटीचा सामना करावा लागत आहे. एकरी उतारा जेमतेम 4 ते 5 पोती असा कसाबसा मिळत आहे. एकरी किमान नऊ ते दहा क्विंटल घटीचे नुकसान शेतकर्‍याला सहन करावे लागत आहे. सध्या बाजारात नवीन सोयाबीनचा दर क्विंटलला 10 मॉईश्चरसाठी 5 हजार 500 रुपयांच्या घरात आहे. मात्र अनेकवेळा सोयाबीन हे सरासरी 20 मॉईश्चर पॉईंट दाखविण्यात येत आहे. यामुळे प्रत्यक्षातील दर हा 4 हजार 500 रुपये असाच मिळू लागला आहे. तर सहा ते सात पॉईंट मॉईश्चर हे सर्रास जादा दाखविण्यात येत असल्याची शेतकर्‍यांची तक्रार आहे. मात्र याकडे शासनाचे अगर कृषी विभागाचे काहीच लक्ष नसल्याने शेतकर्‍यांचा खिसा 'मॉईश्चर'च्या खेळाने हातोहात कातरला जात आहे.

अगदीच विचार केला तर सोयाबीन शेतीची आकडेवारी देखील डोळे विस्फारून टाकणारी ठरते. जिल्ह्यात या खरीप हंगामात सरासरी 59 हजार 340 हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची पेरणी झाली. प्रतिकूल हवामान, पावसाचा लहरीपणा, परतीचा फटका या सार्‍याचा फटका बसून एकरी उत्पादन घटले आहे, जेथे एकरी दहा ते बारा क्विंटल सोयाबीन आरामात निघत होते. तेथे आता जेमतेम 5 ते 6 पोती कसेबसे निघू लागले आहे. एखादाच शेतकरी चांगल्या उत्पादनाचा डाव साधत आहे. एकरी साधारणपणे 5 क्विंटल जरी धरले तरी या 59 हजार 340 हेक्टरमध्ये किमान 7 लाख 41 हजार 750 क्विंटलचे उत्पादन अपेक्षित होते. याचा किमान 7000 रु. जरी दर गृहित धरला तरी 519 कोटी 22 लाख 50 हजार रुपयांचे उत्पन्न मिळू शकले असते. मात्र दरच कमी मिळू लागला आहे. या सार्‍यातून जेमतेम 333 कोटी 78 लाख 75 हजाराचे उत्पन्न मिळते आहे. याचाच अर्थ किमान सरासरी 300 कोटींचा फटका जिल्ह्याच्या अर्थकारणाला बसला आहे. जाणकारांतून देखील याला दुजोरा देण्यात येत आहे.

एकरी सोयाबीन साठीचा खर्च (रु.)

बियाणे : 25 किलो प्रति 120 प्रमाणे……3000
बेसल डोस : डी.ए. पी. एक पोते ………1900
10:26:26 चे एक पोते………………..1775
टोकण, भांगलण……………………….4500

पहिली कीटकनाशक फवारणी…………..0130
तांबेर्‍यासाठी दुसरी फवारणी……………..1800

काढणी (10 मजूर) ……………………2000
मळणी (12 पोती)…………………….2400
वाहतूक………………………………..0350
एकूण खर्च……………………………17855

( नांगरट, खुरटणी, सरी सोडणे हा खर्च उसासाठीच्या तयार शेतात सोयाबीन करत असल्याने धरलेला नाही)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT