सांगली : सचिन लाड
येथील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात (सिव्हिल)उपचार घेणार्यांची संख्या वर्षाकाठी लाखोंच्या घरात असूनही तेथील दानपेट्या कोरड्याच आहेत. वर्षभरात साडेतीन लाख रुग्णांनी उपचार घेतले. पण दानपेट्यांमधून केवळ दोन लाख 32 हजार 413 रुपयांचे दान मिळाले.
चोवीस तास अविरतपणे गेल्या कित्येक वर्षांपासून मोफत उपचार व सेवा देण्याचे काम हे रुग्णालय करीत आहे. एवढा मोठा डोलारा सांभाळत असताना समाजाचा त्याला हातभार लागू नये, याची खंत रुग्णालय प्रशासनाला जाणवू लागली आहे. रुग्णालयात ठेवण्यात आलेल्या दानपेट्यांमध्ये पैशाची दिवसेंदिवस होत असलेली घट चिंतेचा विषय बनला आहे. गोरगरिबांचा आधार म्हणून या रुग्णालयाचा संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात लौकिक आहे. सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर याशिवाय
कर्नाटकातील रुग्णही येथे औषधोपचारासाठी दाखल होतात. ज्येष्ठ नागरिकांना मोफत वैद्यकीय सेवा पुरविली जाते. पिवळी शिधापत्रिकाधारक असणार्या रुग्णांवर मोफत उपचार केले जातात. त्यामुळे खासगी रुग्णालयात औषधोपचार घेण्यापेक्षा शासकीय रुग्णालयात दाखल होण्याचा रुग्णांचा कल वाढला आहे. नेहमी साडेचारशेहून अधिक रुग्ण दाखल असतात. बाह्यरुग्ण विभागात तर दररोज आठशे ते नऊशे रुग्ण उपचार घेऊन जातात. रुग्णालयातील अधिष्ठाता कार्यालयाजवळ दानपेटी बसविण्यात आली आहे. याशिवाय प्रत्येक वार्डातही दानपेटी ठेवण्यात आली आहे. औषधोपचार घेऊन प्रकृती ठिक झाल्यानंतर घरी जाताना रुग्णांनी त्यांच्या इच्छेप्रमाणे या दानपेटीत मदत म्हणून काही रक्कम स्वेच्छेने टाकायची असते.
पूर्वी दानपेट्या पैशाने भरायच्या. वर्षातून दोन-तीन वेळा या पेट्या फोडून पैसे बाहेर काढायला लागायचे.परंतु आता वर्षातून एकदाच पेट्या फोडल्या जात आहेत. केसपेपरचे दहा रुपये भरण्याचे सोडले तर कोणतेही शुल्क न देता रुग्ण उपचार घेत आहेत. आपण महिना-पंधरा दिवस राहून मोफत औषधोपचार घेऊन मृत्यूच्या दाढेतून पडलो; त्या रुग्णालयास काहीतरी आर्थिक मदत देण्याची इच्छा रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी दाखविली पाहिजे.
देवांचे फोटो, घड्याळ देऊन घरचा रस्ता…
एखाद्या गंभीर स्वरूपाच्या आजारातील रुग्ण औषधोपचारानंतर बरा झाला की, वॉर्डातील काही कर्मचारी संबंधित रुग्णाला 'तुमची प्रकृती बरी झाली आहे. खासगी रुग्णालयात गेला असता तर पन्नास ते साठ हजार रुपये गेले असते. त्यामुळे आता आमच्या रुग्णालयाला काही तरी मदत करा', असे आवाहन करतात. त्यावेळीही रुग्ण व अथवा नातेवाईकांची मदत करण्याची इच्छा होत नाही. ते शंभर-दीडशे रुपयांचे घड्याळ अथवा देवाचे फोटो देऊन घर गाठतात. त्यामुळेच दानपेटी पैशाने भरत नाही.
या विभागातील दानपेटीतून मिळाले दान