सांगली; पुढारी वृत्तसेवा : येथील अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीच्यावतीने दिला जाणारा नाट्यक्षेत्रातील मानाचा
विष्णूदास भावे गौरव पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ नाटककार, दिग्दर्शक, अभिनेते, पटकथा लेखक सतीश आळेकर यांना प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष डॉ. शरद कराळे यांनी पत्रकार बैठकीत दिली.
डॉ. कराळे म्हणाले, अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर ही संस्था गेली 80 वर्षे नाट्यक्षेत्रात कार्य करीत आहे. आतापर्यंत 54 मान्यवर रंगकर्मींना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. यावर्षी दि. 5 नोव्हेंबर रंगभूमीदिनी ज्येष्ठ दिग्दर्शक, रंगकर्मी डॉ. जब्बार
पटेल यांच्याहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. शाल, श्रीफळ, गौरवपदक, रोख रक्कम 25 हजार रुपये व स्मृतीचिन्ह
असे पुरस्काराचे स्वरुप आहे. आळेकर हे नाटककार, दिग्दर्शक, नट, पटकथा लेखक आहेत. तसेच पुणे विद्यापीठात ललित कला केंद्राचे विभाग प्रमुख व प्राध्यापक म्हणून काम केले आहे. त्यांनी नाट्यलेखन, एकांकिका, नाट्यदिग्दर्शन, हिंदी, मराठी चित्रपटात
अभिनय केला आहे. त्यांना राज्य शासनाचा नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्कार, राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. तसेच त्यांना आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
यावेळी संस्थेचे विनायक केळकर, विलास गुप्ते, मेघा केळकर, जगदीश कराळे, आनंदराव पाटील, बलदेव गवळी, प्राचार्य डॉ. भास्कर
ताम्हणकर, विवेक देशपांडे, भालचंद्र चितळे आदी उपस्थित होते.