सांगली

सांगली : संजयनगरमधील तीनमजली इमारत ‘बेवारस’

Shambhuraj Pachindre

सांगली : पुढारी वृत्तसेवा

संजयनगरमधील पाटणे प्लॉट येथील तीन मजली इमारत 'बेवारस' आहे. चाळीस वर्षाहून अधिक काळ ही इमारत बंद आहे. इमारतीची देखभाल दुरुस्ती होत नसल्याने काही भाग पडला आहे. धोकादायक बनलेली ही इमारत पाडावी, अशा मागणीचे निवेदन मदनभाऊ युवा मंचचे जिल्हाध्यक्ष आनंद लेंगरे यांनी आयुक्त नितीन कापडणीस यांना दिले.

मदनभाऊ युवा मंचच्या निवेदनात म्हटले आहे की, ही इमारत धोकादायक स्वरूपात आहे. इमारतीचा वरील काही भाग पडला आहे. वरील भाग एका बाजूला झुकला आहे. कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे. या इमारतीलगत बरीचशी बैठी घरे आहेत. इमारत ढासळली तर आजूबाजूच्या बैठ्या घरांचे खूप मोठे नुकसान होऊन जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे. ही इमारत पाडण्याबाबत परिसरातील नागरिकांनी वेळोवेळी महापालिकेकडे तक्रार केली आहे. मात्र गांभिर्याने कार्यवाही होत नाही.
धोकादायक बनलेली ही इमारत पाडावी.

इमारतीची आज पाहणी : सहायक आयुक्त शिंदे

महापालिकेचे सहायक आयुक्त तथा मालमत्ता विभागाचे प्रमुख नितीन शिंदे म्हणाले, या इमारतीची शुक्रवारी पाहणी करण्यात येईल. यापूर्वी या इमारतीची पाहणी केली होती. तेव्हा ही इमारत धोकादायक बनल्याचे दिसत नव्हते. नव्याने पाहणी केली जाईल. या इमारतीचा मालक सापडत नाही.

SCROLL FOR NEXT