सांगली; पुढारी वृत्तसेवा : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. देश स्वातंत्र्य होण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. या शहिदांची सदैव आठवण राहण्यासाठी जिल्ह्यातील पहिले शहीद स्मारक सांगलीत उभारले आहे. हे स्मारक तरुण पिढीला प्रेरणा देईल, असे मत आमदार सुधीर गाडगीळ यांनी व्यक्त केले.
आ. गाडगीळ यांच्या स्थानिक विकास निधीतून साकारलेल्या शहीद स्मारकाचे उद्घाटन रविवारी झाले. यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, पालिका आयुक्त सुनील पवार, एअर कमोंडर दीपक पाटील, भारतीय माजी सैनिक संघटनेच्या अध्यक्षा मीनाक्षी महाडिक, माजी महापौर संगीता खोत, गीता सुतार, अर्बन बँकचे अध्यक्ष गणेश गाडगीळ, नगरसेविका स्वाती शिंदे, नगरसेवक शेखर इनामदार उपस्थित होते. यावेळी तिरंगा राष्ट्रध्वज फडकविण्यात आला.
आमदार गाडगीळ म्हणाले, स्वातंत्र्यलढ्याला शहिदांचा मोठा इतिहास आहे. हा इतिहास भावी पिढीला माहिती होणे गरजेचे आहे. त्यासाठी या स्मारकाची उभारणी केली आहे. शहिदांच्या इतिहासाचा उलगडा होण्यासाठी या स्मारकामध्ये लवकरच लायब्ररी सुरू करण्यात येणार आहे.
यावेळी शहीद झालेल्या कुटुंबीयांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आजी-माजी सैनिक उपस्थित होते.
'अमर जवान ज्योत'
आमदार गाडगीळ म्हणाले, स्मारकातून तरुण पिढीसमोर आदर्श निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या संकल्पनेतून लवकरच 365 दिवस 24 तास 'अमर जवान ज्योत' तेवत ठेवण्यात येणार आहे.