सांगली

सांगली : वीस लाखांची कामे सुचवण्याचे नगरसेवकांना आवाहन

backup backup

सांगली; पुढारी वृत्तसेवा : पदाधिकार्‍यांनी 40 लाखांची, तर नगरसेवकांनी 20 लाखांची कामे नगरअभियंता, शहर अभियंता यांच्याकडे सुचवावीत, असे आवाहन महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे. कामे सुचवण्याचा दुसरा टप्पा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात असेल.

महानगरपालिकेचे सन 2022-23 चे अंदाजपत्रक महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी अंतिम केलेले आहे. महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक एका वर्षावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे अंदाजपत्रकातील कामे तातडीने सुरू करावीत, अशी मागणी सर्वच पदाधिकारी, नगरसेवकांची होती. महापालिकेतील सर्वपक्षीय पदाधिकारी यांना आयुक्त कापडणीस यांच्याकडे तशी मागणीही केली होती.

महापालिकेच्या अंदाजपत्रकात नगरसेवकांना 40 लाख रुपये तर महापौरांना 6 कोटी, उपमहापौरांना 3 कोटी व सभागृह नेते, विरोधी पक्षनेते, गटनेते आदी पदाधिकार्‍यांना 1.50 कोटी ते 2.50 कोटी रुपये विकास निधीची तरतूद केलेली आहे. दरम्यान, पहिल्या टप्प्यात प्रत्येक नगरसेवकांनी 20 लाख रुपयांची, तर प्रत्येक पदाधिकार्‍यांनी 40 लाख रुपयांची कामे नगरअभियंता शहर अभियंता यांच्याकडे सूचवावीत, असे आयुक्त कापडणीस यांनी म्हटले आहे.

दुसरा टप्पा ऑगस्टमध्ये

नगरसेवक व पदाधिकारी यांनी सूचवलेली कामे ही निविदा पद्धतीनेच होतील. दरपत्रकाप्रमाणे कामे प्रस्तावित करू नयेत, असेही म्हटलेले आहे. कामे सूचवण्याचा दुसरा टप्पा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात असेल. त्यावेळीही प्रत्येक नगरसेवकांना 20 लाखांची तर पदाधिकार्‍यांना 40 लाखांची विकास कामे सूचवता येणार आहेत.

केंद्र, राज्य शासनाचा हर घर तिरंगा हा उपक्रम महापालिका क्षेत्रात प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. किमान 1 लाख घरे, कार्यालये, इमारतींवर दि. 11 ते 17 ऑगस्टला भारताचा राष्ट्रध्वज फडकणार आहे. त्यासंबंधीच्या नियोजनासंदर्भात महानगरपालिकेची विशेष महासभा दि. 20 जुलै रोजी होणार आहे.

SCROLL FOR NEXT