सांगली

सांगली : विश्वजितच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब!

दिनेश चोरगे

सांगली;  सुरेश गुदले : महाराष्ट्राच्या राजकारणात दहा वर्षात मोठे बदल झालेले आहेत. अपवाद वगळता बलाढ्य काँग्रेस पक्ष पन्नास वर्षे सत्तेच्या केंद्रस्थानी होता. 2014 नंतर मात्र देशाच्या राजकीय मंचावर मोठी उलथापालथ सुरू झाली. ती का झाली त्याची कारणमीमांसा आजही होते आहे. एक मात्र झाले, कारणे काहीही असतील काँग्रेससह अनेक पक्षांच्या नामवंतांनी भाजपची वाट धरली. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या राजकीय चित्राकडे पाहावे लागेल.

स्वातंत्र्यानंतर काँग्रेसचा बालेकिल्ला अशी जिल्ह्याची ओळख कायम राहिली. महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण, जिल्ह्याचे भाग्यविधाते वसंतदादा पाटील यांना मानणारा फार मोठा जनसमुदाय आजही आहे. लोकमानस आजही काँग्रेसच्या मागे आहे. काँग्रेस संपली, संपेल म्हणणारेच मूळचे काँग्रेसचेच असतात. त्यांनी राजकीय घराच्या दारावरील पाटी बदललेली असते इतकेच. याचा अर्थ त्यांची राजकीय वाटचाल जनता विसरलेली असते, असे नव्हे. भाजपच्या घरात डोकावल्यास काँग्रेस, राष्ट्रवादीसह अन्य पक्षांच्या नेत्यांची मांदियाळी दिसतेच. म्हणून तर भाजप सर्वत्रच राजकीय मित्रांच्या शोधात असतो.

जनमाणस काँग्रेसच्या मागे होते. काँग्रेस चळवळ असल्यापासून पक्षात रुपांतर झाल्यापासून जनमाणसाने काँग्रेसचा हात सोडलेला नाही. याचे एक महत्वाचे कारण अर्थकारणात दडलेले आहे. सहकार चळवळीने ग्रामीण महाराष्ट्राचा चेहरा-मोहरा बदलला. सामान्य माणसाला पत दिली. सावकारी जाचातून सामान्यांची बर्‍यापैकी सुटका झाली. जिल्हा काँग्रेसमय होण्यात सहकार चळवळीचे योगदान मोठे राहिले. काँग्रेसमुळे विकास होतो, स्थिती बदलते याचा विश्वास देण्यात काँग्रेसला मोठे यश आले.

हा झाला संक्षिप्त राजकीय इतिहास. त्याला विलक्षण महत्वाकांक्षा असलेल्या, स्वार्थी काँग्रेस नेत्यांनी छेद दिला. अल्प मुदतीच्या राजकीय स्वार्थासाठी तसेच भयानेही ते भाजपवासी झाले. कारणे काहीही असोत पण सेफ झोनमध्ये राहणे अनेक नेत्यांनी पसंत केले.
या पार्श्वभूमीवर राजकीय दहशत असतानाही जयंत पाटील, स्वर्गवासी पतंगराव कदम, स्वर्गवासी आर.आर. पाटील यांनी कटू अनुभव घेऊनही पक्ष सोडलेला नाही. अलीकडील काळात हा काँग्रेस सोडणार, तो राष्ट्रवादीला रामराम ठोकणार अशा बातम्या पसरवल्या जात होत्या. त्यासाठी राजसत्तेने कोण-कोणती हत्यारे उगारली आणि उगारते आहे, हे सर्वज्ञात आहे. त्यावर समाजमाध्यमात खूप चर्वितचर्वण होते आहे. दहशतीच्या, अस्वस्थ राजकीय भवतालात कुंपणावर बसलेल्या नेत्यांची, कार्यकर्त्यांची संख्या लक्षवेधी होती. अशा स्थितीत कर्नाटक काँग्रेसने निवडणुकीच्या राजकारणात अभूतपूर्व यश मिळवले. त्यामुळे कुंभकर्णी झापेतील काँग्रेसजन जागे झाले. सर्वात महत्वाचे म्हणजे काँग्रेसजनांचे मनोबल वाढले.

सांगली जिल्ह्यात विश्वजित कदम, विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील, विक्रम सावंत यासारख्या तरुण फळीला कर्नाटकमुळे नवसंजीवनी मिळाली. काँग्रेस सोडणार तर नाहीच उलट बळकट करणार हा विश्वास देण्यास कर्नाटकने हात दिला. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या उपस्थितीत सांगलीत महानिर्धार मेळावा घेण्यात आला. त्यास लक्षणीय संख्येने उपस्थिती होती. विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीचे लक्ष्य ठेवून हा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यामुळे काँग्रेसमधील चलबिचल थांबली, असे म्हणणे घाईचे होणार नाही. पक्षांतरावर पडदा टाकण्यास असे मेळावे मदत करत असतात. गयाराम पक्षातच थांबतील. कुंपणावरच्या लोकांना विश्वास मिळू शकतो. मनोबल वाढल्याने काँग्रेसच्या अच्छे दिनाचा प्रारंभ झाला, असे म्हणता येईल. महामेळाव्यामुळे काँग्रेसला पोषक वातावरण निर्मिती झाली. घोडा-मैदानाला अजून काही कालावधी आहे, तोपर्यंत असे वातावरण टिकवावे लागते.

मेळाव्याचे सर्वाधिक श्रेय जाते ते डॉ. विश्वजित कदम यांना. त्यांनी मेळावा यशस्वी करण्यासाठी सर्व प्रकारची मोठी ताकद खर्ची घातली. त्यांचे भाषणही मुद्देसूद होते. अनावश्यक आक्रस्ताळेपणा नव्हता. त्यांच्या बोलण्यातून धोरणी नियोजन जाणवले.
विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील, विक्रम सावंत यांच्यासह काँग्रेसच्या राज्यस्तरीय नेत्यांनीही विश्वजित यांच्या नेतृत्वगुणाचे कौतुक केले. (स्व) डॉ. पतंगराव कदम यांचा राजकीय वारसा त्यांना लाभलेला आहे. अनेक संकटावर मात केली, पण पतंगराव डगमगले नाहीत. त्यांनी कधीच काँग्रेस सोडली नाही. कोणत्याही स्थितीत पक्षांतराच्या संशयाचे ढग निर्माण होणार नाहीत, याची जबाबदारी आता डॉ. विश्वजित कदम यांच्यावर आहे. येणारा काळ कसोटी पाहणाराच आहे. काँग्रेसमधील ऐक्य टिकवत भाजपशी दोन हात करण्यासाठी त्यांचे निकराचे प्रयत्न सध्या दिसतात.

मेळाव्यातील सर्वात महत्वाची घटना म्हणजे विशाल पाटील यांनी विश्वजित कदम यांना दिलेली सलामी. तुम्ही नेतृत्व करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, अशी ग्वाही त्यांनी दिली. काँग्रेसचा पराभव काँग्रेसच करू शकते, अन्य कोणी नाही असे ते म्हणाले. आता याचे भान ठेवून वर्तन करण्याची जबाबदारी अर्थातच विशाल यांची आहे. काही चुका झाल्या, आता त्या पुन्हा होणार नाहीत, असा कबुलीनामाही त्यांनी दिला. लक्षात घेतले पाहिजे की बाजारसमितीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्यांची भाषा वेगळ्या चुलीची होती. आता राजकीय काळाची पावले ओळखून ऐक्य टिकवणे, सवतासुभा न मांडणे आणि एकत्रितच लढणे याला पर्याय असू शकत नाही. दुसरे असे की केवळ निवडणुकीपुरते जागे न होता रोज निवडणुका आहेत, याची जाणीव ठेवून दांडगा जनसंपर्क ठेवावा लागेल. लागली तहान की खण विहीर हा प्रकार जनतेला चालत नाही. निवडणुकीसाठी सदैव तयार असणारा पक्ष म्हणजे भाजप अशी या पक्षाने ओळख निर्माण केलेली आहे. इतके लक्षात घेतले तरी पुरेसे झाले. भाषण दणक्यातच झाले, पण तितकेच पुरसेही नसते. (स्व) वसंतदादा पाटील यांचा वारसा कृतीतून सिद्ध करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.

पृथ्वीराज पाटील यांनाही सहकार महर्षी गुलाबराव पाटील यांचा वारसा आहे. त्यांचाही डॉ. विश्वजित कदम यांना पाठिंबा आहे. विश्वजित यांची सर्व प्रकारची ताकद मोठी आहे. त्यांनी नेतृत्व करावे. काँग्रेसच्या बळकटीसाठी, सत्तेचा सोपान पुन्हा गाठण्यासाठी विश्वजित यांना खंबीर साथ देण्याची पृथ्वीराज यांची भाषा आहे. तात्पर्य काय तर विधानसभा, लोकसभेचे लक्ष्य ठेवून ऐक्याचा निर्धार व्यक्त केलेला आहे. नेतृत्वाचे ठरले आहे.

डॉ. विश्वजित कदम

सर्व प्रकारची मोठी ताकद
पतंगरावांचा समर्थ वारसा
मितभाषी, दांडगा जनसंपर्क
राज्यस्तरावर सर्वपक्षीय नेत्यांशी सौहार्दाचे संबंध
गांधी घराण्याशी जवळीक
पक्ष बळकट करण्याची ताकद
कार्यकर्त्यांची भक्कम जाळ्याची परंपरा
बदलती राजकीय परिभाषा, कार्यपद्धती अवगत
रोजगार, वैद्यकीय आणि शैक्षणिक मदतीत आघाडीवर
कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी वाढविण्याची गरज
माध्यम व्यवस्थापन प्रभावी

विशाल पाटील

वसंतदादा घराण्याचा ऐतिहासिक वारसा
डावपेचात मुत्सद्दीपणाची गरज
दादा घराण्याला मानणारे कार्यकर्ते
दादा गटाच्या पुनरुज्जीवन गरजेचे
जनसंपर्क वाढण्याची मोठी गरज
स्थानिक संस्थांत कार्यकर्त्यांना मोठे करण्याचे आव्हान
साखर कारखाना, शिक्षण संस्थांचा लौकिक वाढविण्याचे आव्हान
राजकीय काळ ओळखून ऐक्यावर ठाम राहण्याची निकड
माध्यम व्यवस्थापनात पिछाडी

पृथ्वीराज पाटील

गुलाबराव पाटील यांचा वारसा
कार्यकर्त्यांचे नेटवर्क
सांगलीत काँग्रेस सक्रिय ठेवण्यात योगदान
राजकीय कार्यक्रमात सक्रियता
हिंदूत्ववादी व्होट बँक वळवण्याचे प्रयत्न
माध्यम व्यवस्थापनात नेमकेपणा
प्रतिमा उंचावण्यासाठी आणखी प्रयत्नांची गरज

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT