सांगली; पुढारी वृत्तसेवा : विधानपरिषदेच्या सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक लांबणीवर हे जवळपास आता स्पष्ट आहे. मात्र, ही निवडणूक किती लांबणीवर जाणार हे अस्पष्ट आहे. महापालिकेच्या विद्यमान नगरसेवकांना या निवडणुकीसाठी मतदान करण्याची संधी लाभणार की हुकणार, याची खुमासदार चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे. दरम्यान, जिल्हा नियोजन समितीवरील महापालिकेच्या प्रतिनिधित्वाची संधीही गेली सव्वाचार वर्षे हुकली आहे. महापालिकेच्या प्रभाग समितींच्या चार सभापतींच्या रिकाम्या खुर्चीकडेही कोणाचे लक्ष दिसत नाही.
विधान परिषदेच्या सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक यापूर्वी दि. 19 नोव्हेंबर 2016 रोजी झाली होती. या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असलेले विद्यमान आ. मोहनराव कदम यांची सहा वर्षांची मुदत दि. 5 डिसेंबर 2022 रोजी संपत आहे. मात्र, या मतदारसंघाची निवडणूक मुदत संपण्यापूर्वी होणार नसल्याचे स्पष्ट आहे. सांगली जिल्हा परिषद तसेच सांगली जिल्ह्यातील पाचही नगरपालिकांची मुदत संपली आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक नियुक्त आहे. सातारा जिल्ह्यातही अशीच स्थिती आहे. एकूण पात्र मतदारांपैकी 50 टक्क्यांहून अधिक मतदार असतील तरच निवडणूक घेता येते. या निकषामुळे विधानपरिषदेच्या सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक लांबणीवर जाणार हे स्पष्ट आहे.
नामाप्र आरक्षणाचा पूर्वलक्षी प्रभावाने लाभ देणे व प्रभाग रचना, सदस्य संख्येतील बदल यावरून दाखल याचिकांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. या याचिका केव्हा निकाली लागणार आणि त्यानंतर संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार, याकडे लक्ष लागले आहे. या निवडणुका होईपर्यंत विधानपरिषदेच्या सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक होणार नाही, हेही स्पष्ट आहे. साांगली महापालिकेच्या विद्यमान नगरसेवकेांची मुदत आठ-नऊ महिने राहिली आहे. या मुदतीत विधानपरिषदेच्या निवडणुकीची संधी लाभणार की हुकणार, याबाबत चर्चा सुरू आहे.
महापालिकेतून जिल्हा नियोजन समितीवर 5 सदस्य निवडून जातात. महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक होऊन सव्वाचार वर्षे झाली तरी अद्याप या 5 जागांसाठी निवडणूक / निवड झाली नाही. जिल्हा नियोजन समितीवरील महापालिकेचे प्रतिनिधीत्व हुकवले आहे. मात्र, त्याबाबत कोणालाच फारसे गांभीर्य दिसत नाही. महापालिकेच्या चार प्रभाग समितींच्या सभापतींची मुदत संपून वर्ष ओलांडले आहे. मात्र, या सभापतींची निवडणूक घेण्याबाबतही कोणाला स्वारस्य दिसत नाही.