सांगली

सांगली : मोकाट 60 जनावरे महापालिकेच्या कोंडवाड्यात

backup backup

सांगली; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेने मोकाट जनावरांवरील कारवाई मंगळवारी दुसर्‍या दिवशीही सुरू ठेवली आहे. दोन दिवसात 60 जनावरे पकडून कोंडवाड्यात ठेवली आहेत. चारा, पाण्याचा खर्च या जनावरांच्या मालकांकडून दंडात्मक कारवाईतून वसूल होणार आहे. दरम्यान, रस्त्यावर जनावरे सोडल्यास मालकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत, असा इशाराही उपायुक्त राहुल रोकडे यांनी दिला.

महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरे रस्त्यावर फिरत होती. मोकाट जनावरांमुळे रस्ते अपघात वाढले. अनेक जनावरांकडून नागरिकांवर हल्ले झाले. नागरिकांना चावा घेतल्याच्या घटना घडत आहेत. यामुळे आयुक्त नितीन कापडणीस यांनी मोकाट जनावरे पकडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सोमवारपासून उपायुक्त राहुल रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यधिकारी डॉ. रवींद्र ताटे, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर, युनूस बारगीर, स्वच्छता निरीक्षक प्राणिल माने, गणेश माळी, अतुल आठवले, धनंजय कांबळे, वैभव कुदळे, पंकज गोंधळे यांच्या टीमने सोमवारी 15 तर मंगळवारी 45 जनावरे पकडली आहेत. यामध्ये 29 घोडे, 29 गाढवे आणि 2 गाईंचा समावेश आहे.

मोकाट जनावरांना पकडण्याची मोहीम यापुढेही सुरू राहणार आहे. जनावर मालकांनी आपली जनावरे रस्त्यावर सोडू नयेत, अन्यथा गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा उपायुक्त राहुल रोकडे यांनी दिला आहे.

चावक्या घोड्याची डोकेदुखी

काही नागरिकांवर हल्ला करून चावा घेतलेला घोडा महापालिकेने पकडून कोंडवाड्यात ठेवला आहे. हा चावका घोडा कोंडवाड्यातील अन्य घोडी, गाढवांना चावत आहे. त्यामुळे त्याला बांधून ठेवण्यात आले, पण त्याने कासरा तोडून चावण्याचा सपाटा सुरू ठेवला आहे. त्यामुळे हा चावका घोडा महापालिकेची डोकेदुखी झाला आहे.

SCROLL FOR NEXT