सांगली

सांगली : मुख्यमंत्र्यांकडून संकेत सरगरला 30 लाखांचे बक्षीस

backup backup

सांगली; स्वप्निल पाटील : पानटपरी म्हटलं की त्याकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो. अनेकजण नाके मुरडतात, परंतु 30 जुलै हा देशाच्यादृष्टीने अतिशय महत्वाचा दिवस ठरला. कारण याच दिवशी सांगलीतील एका पानटपरी चालकाचा मुलगा बर्मिंगहॅम (इंग्लंड) येथे सुरू असणार्‍या राष्ट्रकुल स्पर्धेत वेटलिफ्टिंग करत होता. 55 किलो वजनी गटात रौप्यपदकावर संकेत महादेव सरगर याने नाव कोरले. अन् सांगलीसह देशभरात एकच जल्लोष सुरू झाला. त्याच्या या कामगिरीमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याला राज्य सरकारकडून 30 लाखांची मदत जाहीर केली.

संकेत सरगर हा अतिशय सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेला मुलगा. आटपाडी तालुक्यातील तळेवाडी हे त्याचे मूळ गाव. तुटपुंजी शेती आणि पशुपालन हा त्याच्या वडिलोपार्जित व्यवसाय. परंतु, सांगली जिल्ह्याच्या दुष्काळी टापूत येणार्‍या आटपाडीला दुष्काळ हा पाचवीलाच पुजलेला. त्यामुळे संकेत याचे आजोबा आनंदा सरगर यांनी केळी विक्रीचा व्यवसाय करण्यासाठी सांगली गाठली.

आजोबांसोबत संकेत याचे वडील महोदव सरगर हे देखील सांगलीत आले. त्यांनी वडिलांसमवेत काही दिवस केळी विक्री करण्याचा व्यवसाय केला. त्यानंतर मात्र महादेव सरगर यांनी छोटी पानटपरी टाकली. त्यानंतर भजी आणि चहाचा व्यवसाय सुरू केला.

तीन मुलांमध्ये सर्वात मोठा असणार्‍या संकेत याने पाचवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण सांगलीतील नवमहाराष्ट्र हायस्कूल येथे घेतले. त्यानंतर त्याने जिल्ह्यातील आष्टा येथील आर्ट्स अ‍ॅण्ड कॉमर्स महाविद्यालयात शिक्षण घेतले. संकेत याच्या वेटलिफ्टिंगची आवड पाहता प्रशिक्षण नाना सिंहासने, मयूर सिंहासने व मधुरा सिंहासने यांनी भारोत्तलनाचे मार्गदर्शन व शिक्षण संकेत याला दिले. या प्रशिक्षकांनीच संकेत व काजल या बहीण-भावाला या खेळाचे धडे दिले. प्रशिक्षण देऊन खेळाची आवड निर्माण केली.

हळूहळू सराव वाढू लागला अन् इतिहास रचण्यासाठी संकेत आणि काजलची पाऊले पडू लागली. सुवर्ण पदकाच्या जिद्दीने पेटून उठलेल्या संकेत याने सांगलीतील दिग्विजय वेटलिफ्टिंग प्रशिक्षण केंद्रात वयाच्या 13 व्या वर्षापासून सराव सुरू केला होता. दररोज 9 ते 10 तास तो वेटलिफ्टिंगचे धडे गिरवू लागला. दरम्यान, संकेत अनेक राष्ट्रीय खेळांमध्ये सहभाग नोंदवू लागला. याची दखल घेत त्याची भारत सरकारच्या 'स्कीम टॉप्स्' मध्ये निवड करण्यात आली. त्यानंतर मात्र संकेत याने मागे वळून पाहिले नाही.

बर्मिंगहॅम (इंग्लंड) येथे होणार्‍या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी संकेत याची निवड झाली अन् कुटुंबाला पारावार उरला नाही. संकेत सरगर हा शनिवारी (दि. 30 जुलै) रोजी वेटलिफ्टिंग करण्यासाठी दाखल झाला. तो वेटलिफ्टिंग करणार तोवर त्याच्या हाताच्या जुन्या दुखण्याने डोके वर काढले अन् केवळ एका किलोच्या वजनी फरकाने संकेत याला सुवर्ण पदकाने हुलकावणी दिली आणि संकेत याने राष्ट्रकुल स्पर्धेत वेटलिफ्टिंग स्पर्धेत रौप्य पदकावर आपले नाव कोरले. आनंदाचा पारवर न उरलेल्या कुटुंबाने गुलालाची उधळण करीत जल्लोष सुरू केला.

प्रशिक्षकांनाही 7.5 लाखांचे बक्षीस

सांगलीच्या संकेत सरगर याने राष्ट्रकुल स्पर्धेतील पहिले पदक पटकाविताच देशभरात जल्लोष सुरू केला. याची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यसरकारकडून संकेत सरगर याला 30 लाखांची मदत केली. तर त्याच्या प्रशिक्षकांनाही साडेसात लाखांचे पारितोषिक देण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

उत्कंठा शिगेला…मारली बाजी

संकेत याच्या वेटलिफ्टिंगकडे सार्‍या देशभराचे लक्ष लागू राहिले होते. काही वेळासाठी सांगलीतील प्रत्येकाच्या घरातील टीव्ही स्क्रीनवर संकेत याचा खेळ सुरू होता. काही क्षणात त्याने बाजी मारली अन् अतिशय सर्वसामान्य असणार्‍या संकेत याच्या आई-वडिलांवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. शुभेच्छा देण्यासाठी रविवारी खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासह अनेकांची गर्दी झाली होती.

जयंत पाटील यांच्याकडून विचारपूस

संकेत याच्या यशानंतर सांगलीचे माजी पालकमंत्री जयंत पाटील यांनी तातडीने संकेत याच्यासोबत ऑनलाईन व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून संपर्क साधून शुभेच्छा दिल्या. परंतु दुखण्यातून बरे झाल्यानंतर व सरकारच्या शेड्युलनुसारच सांगलीत येणार असल्याचे संकेत याने जयंत पाटील यांना सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT