सांगली

सांगली : मिरजेतील तंतुवाद्य कारागिर देणार मलेशियातील संगीतप्रेमींना धडे

मोनिका क्षीरसागर

मिरज : पुढारी वृत्तसेवा
'तंतुवाद्याचे माहेरघर' अशी ख्याती असलेल्या मिरजेतील तंतुवाद्य निर्मितीची कला जाणून घेण्याची इच्छा आता परदेशी नागरिकही करीत आहेत. मलेशियामधील संगीत संस्थेमार्फत पाच दिवसांची कार्यशाळा होत आहे. त्यासाठी मिरजेतील तंतुवाद्य निर्मात्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. मलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथे ही कार्यशाळा आहे.

याबाबत बोलताना आतिक सतारमेकर म्हणाले, मिरज शहर हे तंतुवाद्य निर्मितीसाठी जगभर प्रसिद्ध आहे. शहरातील आद्य तंतुवाद्य निर्माते फरीदसाहेब सतारमेकर यांनी या व्यवसायाची मुहुर्तमेढ येथे रोवली. त्यानंतर दीडशे वर्षांहून अधिक काळ येथे तंतुवाद्य निर्मितीचा व्यवसाय जोमाने सुरू आहे. येथील तंतुवाद्यांना जगभरातून मागणी आहे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अनेक गायक-वादक मिरजेतीलच वाद्यांना पसंती देतात. भारतीय शास्त्रीय संगीताची आवड असलेले परदेशी नागरिकही मिरजेतील वाद्यांची मागणी करतात.

तंतुवाद्य निर्मितीचा लौकिक जगभर पसरला आहे. त्यामुळे विविध देशातील संगीतप्रेमी नागरिकांना भारतीय तंतुवाद्यांविषयी कुतूहल, जिज्ञासा आहे. ही वाद्ये कशी तयार करतात? त्यांना जवारी कशी लावली जाते? यांसह अनेक प्रश्न त्यांच्या मनात उद्भवतात. त्यांचे हे कुतूहल शमविण्यासाठी मलेशियातील संगीत संस्थेमार्फत तंतुवाद्य निर्मितीच्या कार्यशाळेचा अभिनव उपक्रम राबविला आहे.
दि. 20 ते 25 जून दरम्यान या संस्थेमार्फत मलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथे तंतुवाद्य निर्मिती कार्यशाळा आयोजित केली
आहे.

पाच दिवसांच्या या कार्यशाळेत तंतुवाद्य कसे तयार केले जाते? त्याला तारा कशा बसवल्या जातात. विविध तंतुवाद्यांमध्ये काय फरक असतो, जवारी कशी काढली जाते? यांसह तंतुवाद्यनिर्मितीच्या अन्य अंगांची माहिती मलेशियन संगीतप्रेमींना करून देणार आहेत. परदेशातील अशा पद्धतीच्या कार्यशाळेत सहभागी होण्याचा बहुमान मिरजेतील तंतुवाद्य निर्माते यांना मिळाला आहे. मिरजेच्या तंतुवाद्यनिर्मिती क्षेत्राच्या दृष्टीने ही बहुमानाची गोष्ट आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT