सांगली

सांगली : मिरजेचा बायोमेडिकल वेस्ट प्रकल्प ‘कोकण’ला ठरावात तिसर्‍यांदा बदल

सोनाली जाधव

सांगली : पुढारी वृत्तसेवा
मिरजेजवळील बेडग रस्त्यावरील महानगरपालिकेचा बायोमेडिकल वेस्ट प्रकल्प (कॉमन इन्सिनेटर प्रकल्प) आयएमए (मिरज) ऐवजी कोकण केअर एंटरप्रायजेस यांना चालविण्यास देण्याचा महासभेचा ठराव समोर आला आहे. त्यावरून उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे. प्रकल्प चालविण्यास देण्याचा ठेका वादाच्या भोवर्‍यात सापडला आहे. महापालिकेतील एका पदाधिकार्‍यांनी नाराजी व्यक्त केली.
बायोमेडिकल वेस्ट प्रकल्प व त्यास आवश्यक जागा आयएमए (पुलाची शिरोली) यांना दरमहा 40 हजार रुपये रॉयल्टी भरण्याच्या अटीवर 15 वर्षे मुदतीने देण्याचा ठराव महानगरपालिकेत भाजपची सत्ता असताना दि. 20 जानेवारी 2021 च्या महासभेत झाला होता.

दि. 23 फेब्रुवारी 2021 रोजी महापालिकेत सत्तापरिवर्तन झाले. राष्ट्रवादीने मिरज येथील बायोमेडिकल वेस्ट प्रकल्प आयएमए पुलाची शिरोली यांना चालविण्यास देण्याचा ठेका रद्द करून तो आयएमए मिरज यांना देण्याचा विषय दि. 12 मे 2021 च्या महासभेपुढे आणला. त्याला उपमहापौर व काँग्रेसच्या 19 सदस्यांनी विरोध लेखी विरोध केला. काँग्रेसचा विरोध डावलून हा प्रकल्प आयएमए मिरज यांना चालविण्यास देण्याचा ठराव करण्यात आला. आता तो ठरावही रद्द करून बायोमेडिकल वेस्ट प्रकल्प कोकण केअर एंटरप्रायजेस यांना चालविण्यास देण्याचा ठराव केला आहे.

दरम्यान, दि. 12 मे 2021 च्या ठरावान्वये हा प्रकल्प आयएमए मिरज यांना चालविण्यास देण्यास मान्यता देऊनही प्रकल्प चालू केला नसल्याकडे लक्ष वेधत कोकण केअर एंटरप्रायजेसला हा ठेका चालविण्यास देण्यास दि. 20 ऑक्टोबर 2021 च्या महासभेची मान्यता दिली आहे. बायोमेडिकल वेस्ट प्रकल्प कायद्यातील तरतुदीनुसार आवश्यक त्या सुधारणा प्रकल्पाच्या जागेवर करून सर्व प्रक्रिया पूर्ण करून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी आणण्याची जबाबदारी कोकण केअरवर निश्‍चित केली आहे. दरमहा 50 हजार रुपये रॉयल्टी महापालिकेस भरण्याच्या अटीवर त्यांना पंधरा वर्षे मुदतीने चालविण्यास देण्याचा ठराव करण्यात आला आहे.
दरम्यान, हा ठराव समोर आला असून त्यावर उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे. प्रकल्प चालविण्याचा ठेका वादाच्या भोवर्‍यात सापडण्याचे संकेत मिळत आहेत.

SCROLL FOR NEXT