सांगली

सांगली : ‘माझी कन्या भाग्यश्री’ ठरली कमनशिबी

दिनेश चोरगे

सांगली;  संजय खंबाळे :  सांगली, मिरज शहरासह जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात एका मुलीवर केवळ 16 महिलांनी आणि दोन मुलींच्या जन्मानंतर 382 मातांनी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली आहे. या 398 जणींना 'माझी कन्या भाग्यश्री' योजनेचा लाभ देण्यात आला. काही लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्याची कार्यवाही सुरू आहे.

शासनाकडून 1 ऑगस्ट 2017 नंतर जन्मलेल्या मुलींना 'माझी कन्या भाग्यश्री' या योजनेचा लाभ देण्यात येतो. एका मुलीवर आई अथवा वडील पैकी एकाने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली असेल तर 50 हजाराचे अनुदान देण्यात येते. दोन मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली असेल तर प्रत्येक मुलीस 25 हजार रुपये अनुदान देण्यात येते.

माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत लाभार्थी मुलगी व तिची आई किंवा वडील यांचे संयुक्त बचत खाते बँकेत उघडण्यात येते. त्यावर प्रशासनाच्या मदतीने पैसे जमा करण्यात येतात. आज सुशिक्षितांचे प्रमाण वाढले आहे. शासनाकडून मुलगा अथवा मुलगी असा भेदभाव कमी करण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र जिल्हा परिषदेकडून मिळालेल्या माहितीनुसार पाच वर्षांत एका मुलीवर केवळ 16 महिलांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली आहे. तर 381 आई किंवा वडिलांनी दोन मुलींवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून स्त्री अथवा पुरुष या भेदभावाला छेद दिला आहे. पाच वर्षातील आकडेवारीचा विचार केल्यास जिल्ह्यात अजूनही स्त्री, पुरुष असा भेदभाव होत आहे.

एक मुलगी : शिराळा तालुका आघाडीवर

जिल्ह्यात शिराळा तालुक्यात सर्वाधिक म्हणजेच केवळ पाच महिलांनी एका मुलीनंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली आहे. त्याचबरोबर मिरज तालुक्यात 2, वाळवा 1, जत 1, पलूस 4, आटपाडी 2, कवठेमहांकाळ 1, सांगली 1 अशा 17 महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.

दोन मुलीत 'मिरज' आघाडीवर

दोन मुलींवर कुटुंब नियोजनाचे नियोजन करण्यामध्ये मिरज तालुक्याची घोडदौड दिसते आहे. तालुक्यात 59 महिलांनी दोन मुलींवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली आहे.

'माझी कन्या भाग्यश्री'चे उद्दिष्ट

मुलींचा जन्मदर वाढावा, मुलींना शिक्षण मिळावे, मुलगा, मुलगी भेदभाव नको, असे अनेक उद्दिष्ट ठेवून ही योजना शासनामार्फत राबविण्यात येते. जिल्हा परिषदेमार्फत वेळोवेळी याबाबत जनजागृती करण्यात येते. विविध कार्यक्रम, प्रबोधन करण्यात येतात. मात्र वंशाला दिवा हवा, हा विचार अद्याप दूर होत नाही. सुशिक्षित म्हणून मिरवणार्‍यांच्या मानसिकतेत बदल होताना दिसत नाही.

तीन तालुक्यात एका मुलीवर शस्त्रक्रियेचे प्रमाण शून्य

जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात तासगाव, खानापूर, कडेगाव या तालुक्यातील एकाही महिलेने एका मुलीवर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केलेली नाही. त्यामुळे या तालुक्यात स्त्री, पुरुष हा भेदभाव किती मुळापर्यंत रुचलेला आहे, हे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. त्यामुळे या तालुक्यातील लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने आता आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. तसेच जनजागृतीसाठी विशेष मोहीम राबवण्याची गरज आहे.

सांगली जिल्ह्याने राज्यभर विविध गोष्टींमध्ये प्रगती केली. आज जिल्ह्याची ओळख पुरोगामी म्हणून होत आहे. मात्र आजही लोकांच्या पुरुषी मानसिकतेत बदल होताना दिसत नाही. स्त्री- पुरुष हा भेदभाव होतो, हे आश्चर्यकारक आहे. लोकांच्या मानसिकतेमध्ये बदल करण्यासाठी जनजागृती करणे गरजेचे आहे.
– डॉ. निर्मला पाटील, सामाजिक कार्यकर्त्या

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT