सांगली; पुढारी वृत्तसेवा: म्हैसाळ (ता. मिरज) येथील वनमोरे कुटुंबातील नऊ जणांचा बळी घेणारा मांत्रिक आब्बास बागवान याने आजपर्यंत गुप्तधन देण्याच्या अमिषाने अनेकांवर 'विषप्रयोग' केले असल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत त्याच्या भोंदुगिरीने 12 जणांचा बळी घेतला आहे. त्याच्या भोंदूगिरीचा फार मोठा पसारा त्याच्या सोलापूर या मूळगावी पसरला आहे. तिथे मौलाना या नावाने तो 'फेमस' आहे. खुनाच्या प्रयत्नासह अनेक गंभीर गुन्ह्यांची त्याच्या नावे पोलिस दप्तरी नोंद झालेली आहे.
आब्बास बागवान हा सोलापुरात मौलाना अब्बास बागवान नावाने ओळखला जातो. पाच्छा पेठ, तेलंगी पाच्छा पेठ, मुस्लिम पाच्छा पेठ या वेगवेगळ्या भागात गेल्या अनेक वर्षांपासून त्याने भोंदूगिरीचा बाजार मांडला आहे. 2009 मध्ये त्याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला होता. त्याची प्रचंड दहशत आहे. मंत्रतंत्राच्या मदतीने तो आपले बरेवाईट करेल, अशी त्या भागातील नागरिकांना आजही भीती आहे.
बागवानने 2009 मध्ये सोलापुरात एका प्रसिद्ध व्यापार्याला 'तुमच्या घरात गुप्तधन आहे. मंत्रतंत्राचे पठण करून ते बाहेर काढून देतो', असे आमिष दाखविले होते. 'तुमच्या शेतातही गुप्तधन असून, ते मला दिसत आहे', अशीही त्याने थाप मारली होती. त्यामुळे गुप्तधन काढण्यासाठी या व्यावसायिकाने विजापूर वेस येथे स्वत:च्या घरी पूजेची तयारी केली होती. बागवानने पूजेवेळी 'फक्त तुमचा मोठा मुलगा व मोठी सून असणे गरजेचे आहे', असे त्या व्यावसायिकास सांगितले. यासाठी त्याने संबंधित व्यावसायिकाकडून मोठी रक्कम घेतली होती. एके दिवशी मध्यरात्री त्याने पूजा सुरू केली. सर्वप्रथम त्याने घरात धूर केला. त्यानंतर त्याने पूजा सुरू केली.
घरातील प्रत्येक सदस्याला त्याने बाहेरगावी आणि शहरातील नातेवाईकांच्या घरात मुक्कामास पाठविले. मात्र त्या व्यावसायिकाच्या मुलाला आणि सुनेला आपल्यासोबत घरातच थांबण्याची सक्ती केली. बागवानने रात्रभर काय पूजा केली ते कुणालाही कळले नाही. कोणत्याही प्रकारचे गुप्तधन निघाले नाही. मात्र दुसर्या दिवशी सकाळी व्यावसायिकाच्या सुनेचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. तर मुलगा विषारी द्रव्य प्राशन करून बेशुद्धावस्थेत सापडला होता. उपचारामुळे मुलगा बचावला.
या प्रकरणातही बागवानवर गुन्हा दाखल झाला होता. म्हैसाळ येथे नऊ जणांचा त्याने बळी घेतल्याने सध्या सोलापुरात त्याच्या भोंदूगिरीची जोरदार चर्चा आहे. म्हैसाळ हत्याकांडामुळे मांत्रिक बागवान याच्या भोंदूगिरीच्या आणि त्यामुळे बळी गेलेल्यांच्या आठवणी ताज्या केल्या जात आहेत. मात्र याशिवायही इतर काहीजण या मांत्रिकाच्या भोंदूगिरीला बळी पडले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर बागवान, त्याची भोंदूगिरी आणि त्याच्या कारस्थानांचा खोलात जाऊन पर्दापाश करण्याची गरज आहे