सांगली

सांगली : महिन्याला सापडताहेत दोन पिस्तूल!

Shambhuraj Pachindre

सांगली : सचिन लाड सांगली, मिरजेसह जिल्ह्यात गेल्या चार वर्षात 76 पिस्तुले जप्त करण्यात आली आहेत. पिस्तूल बाळगणार्‍या 82 संशयितांना अटक करण्यात आली आहे. दहशत माजविणे व स्वसंरक्षणासाठी या संशयितांनी परराज्यातील तस्करांकडून पिस्तुले खरेदी केल्याचे निष्पन्न झाले आहे.

मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार आणि पंजाब राज्यातून पिस्तुलांची खरेदी करून त्याची तस्करी केली जात आहे, ही बाब अनेकदा पोलिस तपासातून पुढे आली आहे. स्थानिक पोलिसांशिवाय स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून सातत्याने पिस्तुले व काडतुसे जप्त करण्याची कारवाई होते. संशयिताला एक-दोन दिवसच पोलिस कोठडी मिळते. कोठडी पुरेशी मिळत नसल्याने तपासाला मर्यादा पडतात. संशयिताला बाहेरच्या राज्यात घेऊन तपासाला जाणे शक्य होत नाही. परिणामी तपासाला पूर्णविराम मिळतो. अवघ्या पाच-दहा हजारांमध्ये परराज्यातून पिस्तुलांची खरेदी केली जाते. ते महाराष्ट्रात आणण्यासाठी मोठी टोळी कार्यरत आहे. अगदी रेल्वेतून खुलेआम प्रवास करीत पिस्तुलांची तस्करी केली जात आहे. खिशातून सहजपणे चार-पाच पिस्तुले घालून आणली जातात. पोलिसांना जराही संशय येत नाही. येथे आल्यानंतर हे पिस्तूल पन्नास ते साठ हजाराला विकले जाते.

तस्करी आणि विक्रीचा हा धंदा खूप वर्षापासून सुरू आहे. अनेकदा सांगली पोलिसांनी परराज्यात जाऊन तस्करांची पाळेमुळे खणून काढण्याचा प्रयत्न केला. काही मुख्य तस्करांच्या मुसक्याही आवळल्या. त्यावेळी पोलिसांवर हल्ला पण झाला होता. मात्र तरीही तस्करी सुरूच राहिली आहे. खासगी सावकार, गुन्हेगार व तसेच फाळकूटदादा पिस्तूल खरेदी करून बाळगतात. खबर्‍यामार्फत माहिती मिळाली तर पोलिसांना पिस्तूल जप्त करता येते. गेल्या चार वर्षात 76 पिस्तुले जप्त करण्यात आली. वर्षाकाठी 22 ते 28 पिस्तुले जप्त केली जातात. यावरून साधारणपणे महिन्यात किमान दोन पिस्तूल व तीन चार काडतुसे जप्त होत आहेत. संशयितांविरूद्ध न्यायालयात दोषारोपपत्र करण्यासाठी पोलिसांना जिल्हाधिकार्‍यांची परवानगी घ्यावी लागते.

गोळीबार झालाय का नाही? अहवाल प्रलंबित!

रिव्हॉल्व्हर किंवा पिस्तूल सातत्याने जप्त करण्याची कारवाई होत आहे. जप्त केल्यानंतर संशयिताला अटक केली जाते. त्याने पिस्तूलमधून गोळीबार केला आहे का नाही? याची तपासणी करणे गरजेचे असते. यासाठी हे पिस्तूल पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविले जाते, पण तपासणीचा अहवाल तातडीने मिळत नाही. परिणामी अनेक प्रकरणात पोलिसांना संशयितांविरूद्ध 90 दिवसाच्या आत न्यायालयात दोषारोपपत्र करता येत नाही. याचा फायदा घेत संशयित सहीसलामत बाहेर सुटतात.

वर्षे      पिस्तूल     अटक आरोपी
2019 :   28                    26
2020 :  13                     20
2021 :  22                     24
2022 जुलै अखेर : 13       12
एकूण : 76                       82

सापडलेली काडतुसे
2019 : 58
2020 : 26
2021 : 44
2022 : 26
एकूण : 154

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT