सांगली; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेत सोमवारी होणार्या महासभेत विषयपत्रकावरील सर्व विषयांवर खुल्या चर्चेसाठी आग्रही रहायचे; केवळ मंजूर मंजूर अशा पद्धतीने महासभेचे कामकाज चालू द्यायचे नाही, असे गुरुवारी काँग्रेसच्या पार्टी मिटींगमध्ये ठरले. 'महापालिकेची अवस्था 12 फौजदार आणि 2 हवालदार', अशी झाल्याची टिपण्णी एका नगरसेवकांनी केली.
महापालिकेत गुरुवारी काँग्रेसची पार्टी मिटींग झाली. विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे गटनेते संजय मेंढे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. बैठकीला काँग्रेसचे नगरसेवक उपस्थित होते.
विधवा प्रथाबंदीसाठीच्या विषयाला एकमुखी पाठिंबा देण्याचा निर्णय पार्टी मिटींगमध्ये झाला. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागांतर्गत घनकचरा वाहतुकीकरीता लागणारे इंधन, वंगण यांची बिले चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून खर्ची टाकण्याच्या मान्यतेचा विषय महासभेपुढे आला आहे. शासन निर्णयानुसार चौदाव्या वित्त आयोग निधीतून ही रक्कम खर्ची टाकता येत नसल्याकडे सदस्यांनी लक्ष वेधले. या विषयावर महासभेत खुल्या चर्चेसाठी आग्रही राहण्याचा निर्णय घेण्यात आला.
महानगरपालिकेची मुख्यालय इमारत विजयनगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयाशेजारी पश्चिमेला होणार आहे. स.नं. 124 व 125 मधील जमिनीपैकी महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीसाठी वाटप झालेल्या जमिनीस सांगली-मिरज रस्त्यापासून पोहोच रस्त्यासाठी खासगी आरक्षित जागा संपादन करण्याचा विषय महासभेपुढे आहे. या विषयावरही खुली व सविस्तर चर्चेसाठी आग्रही राहण्याचा निर्णय घेण्यात आला.
सन 2018 पासून प्रलंबित कामांवरून नुकतेच महापालिकेत खडाजंगी चर्चा झाली. या सभेतील निर्णयावरील कार्यवाहीचा लेखाजोखाही घेतला जाणार आहे. कर्मचार्यांची संख्या कमी आणि अधिकार्यांची संख्या जास्त होत असल्यावरूनही चर्चा होणार आहे.