सांगली

सांगली : महापालिकेच्या उपक्रमांची विधीमंडळ समितीवर छाप

backup backup

सांगली; पुढारी वृत्तसेवा : विधानमंडळ महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समितीसमोर महानगरपालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी विविध उपक्रमांचे सादरीकरण केले. महापालिकेने उभारलेले चिल्ड्रेन पार्क, मध्यवर्ती निदान केंद्र, मॉडेल स्वच्छतादूत निवारा केंद्र, आपत्ती व्यवस्थापन केंद्र, अभ्यासिकेची समितीने पाहणी केली. महानगरपालिकेच्या या उपक्रमांची व सादरीकरणाची समितीवर चांगली छाप पडली.

आमदार सरोज अहिरे यांच्या अध्यक्षतेखालील विधानमंडळाच्या समितीचा दौरा बुधवारी सुरू झाला. दुपारी या समितीने जिल्ह्यातील प्रमुख कार्यालयांच्या संबंधित विभाग प्रमुखांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात घेतली. महिला व बालविकास योजना, उपक्रमांच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने प्रश्नोत्तरे झाली. विधानमंडळाच्या या समितीच्या अध्यक्षा आमदार सरोज अहिरे, आमदार सुमनताई पाटील, आमदार मनीषा कायंदे, आमदार लता सोनवणे व समिती सदस्यांनी आढावा
घेतला.

झाडाझडतीनंतर नूर पालटला

महिला व बाल कल्याणच्या अनुषंगाने महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येत असलेल्या योजना, उपक्रम तसेच प्रस्तावित योजना, उपक्रमांचे सादरीकरण आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले. या सादरीकरणासाठी 5 मिनिटांचा कालावधी दिला होता, मात्र प्रभावी नावीन्यपूर्ण उपक्रम व प्रभावी सादरीकरणामुळे महापालिकेस वीस-पंचवीस मिनिटे कालावधी मिळाला. या समितीने अन्य काही कार्यालयांची झाडाझडती घेतली होती. मात्र महापालिकेच्या प्रभावी सादरीकरणानंतर आढावा बैठकीचा नूर पालटला. समितीवर चांगली छाप पडली.
दिव्यांगांसाठी उद्यान
विधानमंडळ समितीने महानगरपालिकेच्या मॉडेल स्वच्छतादूत निवारा केंद्राची पाहणी केली. चिल्ड्रेन पार्कचे कौतुक केले. बालकांच्या मनोरजंनाबरोबर त्यांच्या सुरक्षिततेसाठी मैदानात सर्वत्र समुद्राची रेती टाकल्याचे पाहून समाधान व्यक्त केले. लहान मुले खेळताना पडली तरी रेतीमुळे त्यांना इजा होणार नसल्याने
समाधान व्यक्त केले. दरम्यान दिव्यांगांसाठी उद्यान विकसित करण्याची सूचना समितीने महापालिकेला केली.
आपत्ती व्यवस्थापन केंद्रात तंत्रज्ञानाचा वापर केल्याने या केंद्रातून महापूर आपत्ती नियंत्रण करणे सुलभ होणार असल्याचे मतही समिती सदस्यांनी व्यक्त केले. महानगरपालिकेच्या मध्यवर्ती निदान केंद्राबद्दलही समितीने गौरवोद्गार काढले.

'निर्भया'ला वाहन, सीसीटीव्ही कॅमेरे

महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी सकाळी विधीमंडळाच्या समितीच्या अध्यक्षा आमदार सरोजा अहिर, आमदार सुमनताई पाटील यांचे स्वागत केले. महिला व बालकल्याणसाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती दिली. महिला सुरक्षेसाठी निर्भया पथकाला वाहन दिल्याचे तसेच शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार असल्याचे
सांगितले.

समितीला आवडली 'यलो सिटी' संकल्पना

हळदीने सांगलीचे नाव जगभर केले आहे. सांगलीच्या हळदीची ही जुनी परंपरा, चांगला वारसा जतन करण्यासाठी महानगरपालिकेने 'सांगली यलो सिटी' ही संकल्पना पुढे आणली आहे. शहरातील इमारती पिवळ्या रंगात झळाळणार आहेत. 'यलो सिटी'ची माहिती आयुक्त कापडणीस यांनी समितीसमोर मांडली. नवीन व चांगली संकल्पना असल्याचे समितीने म्हटले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT