सांगली

सांगली : महापालिका हद्दीबाहेर दिली अग्निशमन एनओसी

backup backup

सांगली; पुढारी वृत्तसेवा : महापालिका हद्दीबाहेर एनओसी प्रमाणपत्र दिल्याप्रकरणी महापालिकेचे तत्कालीन प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकारी चिंतामणी कांबळे यांची चौकशी करावी, अशी मागणी संतोष कदम यांनी केली आहे. नगरविकासच्या प्रधान सचिवांना तक्रारपत्र पाठविले आहे.

प्रधान सचिवांना पाठविलेल्या पत्रात कदम यांनी म्हटले आहे की, महापालिकेचे तत्कालीन प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकारी चिंतामणी कांबळे यांच्याकडे दि. 8 ऑगस्ट 2019 पासून तो कार्यभार दिला होता. महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम 2006 व नियम 2008 हा राज्यात लागू झाला आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक महापालिका प्रशासनाने या नियमाची अंमलबजावणी करणे अनिवार्य आहे.

त्यानुसार महापालिका हद्दीत अग्निशमनचे नाहरकत दाखले देण्याचे व त्यातून गोळा होणारा महसूल (आग सुरक्षा निधी) घेण्याचे अधिकार अग्निशमन अधिकारी यांना देण्यात आले आहेत. पण संबंधित महापालिका हद्दीबाहेरील कोणत्याही इमारतीला दाखले देण्याचे अधिकार व महसूल गोळा करण्याचे अधिकार हे संचालक महाराष्ट्र सेवा मुंबई यांना दिलेले आहेत.

महापालिकेच्या कोणत्याही विभागाच्या कोणत्याही अधिकार्‍यास महापालिका हद्दीबाहेर जाऊन काम, कार्य, परवाने देण्याचे अधिकार नाहीत. पण महापालिकेचे तत्कालीन मुख्य अग्निशमन अधिकारी यांनी अधिकाराचा गैरवापर करत महापालिका हद्दीबाहेर नाहरकत प्रमाणपत्र दिले आहेत. त्यांच्या संपत्तीची व कारभाराची चौकशी करावी.

SCROLL FOR NEXT