सांगली; पुढारी वृत्तसेवा : कवठेमहांकाळ येथील महांकाली कारखान्याने थकीत कर्ज अटीनुसार मार्च 2023 अखेर 28 कोटी रुपये भरले नाही. ती रक्कम येत्या पंधरा दिवसात कारखान्याने भरावी अन्यथा करारातील अटी- शर्तीप्रमाणे कारखान्यास जमीन विक्रीची दिलेली परवानगी रद्द करण्यात येईल, असा इशारा जिल्हा बॅँकेने दिला आहे. दरम्यान, महांकाली कारखान्याने आठ दिवसात रक्कम भरण्याचे आश्वासन बॅँकेस दिले आहे.
जिल्हा बॅँकेने महांकाली साखर कारखान थकीत कर्जाच्या वसुलीसाठी सिक्युरीटायझेशन अॅक्टअंतर्गत ताब्यात घेतला. या कारवाईला कारखान्याने ऋण वसुली प्राधिकरणाकडे आव्हान दिले होते. कारखान्याची सुमारे 80 एकर जमीन विक्री करून जिल्हा बॅँकेचे कर्ज परत फेडण्याची आमची तयारी असल्याचे कारखान्याने प्राधिकरणासमोर सांगितले. यासाठी तीन वर्षाची मुदतही मागीतली होती. प्राधिकरणाने कारखान्याचा हा प्रस्ताव मान्य करत जिल्हा बॅँकेला तसे आदेश दिले. मात्र जिल्हा बॅँकेने तीन वर्ष मुदत न देण्याची आपली भूमिका कायम ठेवत प्राधिकरणाच्या निर्णयाविरोधात अपील केले. कारखाना व बॅँकेच्या पदाधिकार्यामध्ये चर्चेतून यावर तोडगा काढण्यात आला. जिल्हा बॅँकेने जमीन विक्री करण्यास परवानगी द्यावी यानंतर कारखाना सप्टेंबर 2023 पर्यंत बॅँकेचे सर्व कर्ज हप्त्या हप्त्यात परत करेल, असे ठरले. यावर बॅँकेच्या संचालक मंडळाने शिक्कामोर्तब केला. तसेच सदरचा प्रस्ताव प्राधिकरणास सादर करून मान्यता घेण्यात आली. मात्र सप्टेंबर 2023 पर्यंत सर्व कर्ज फिटेपर्यंत बॅँकेने अपील मागे घेणार नसल्याची तसेच ठरल्याप्रमाणे हप्ते न भरल्यास जमीन विक्रीला दिलेली परवानगी रद्द करण्याची अट घातली. याबाबत जिल्हा बॅँक, महांकाली कारखाना व जमीन विकसकामध्ये कायदेशीर करार करण्यात आला.
महांकाली कारखान्याचे सुमारे 140 कोटींचे कर्ज थकीत होते. कारखान्याने ओटीएसचा लाभ घेतला. त्यामुळे हे कर्ज 117 कोटींवर आले. यातील 4 कोटी रुपये करार झाल्यानंतर भरण्यात आले. नंतर चार ते पाच कोटी रुपये कारखान्याने भरले. मार्च 2023 अखेर कारखान्याने 35 कोटी रुपये जिल्हा बॅँकेला भरणे अपेक्षित होते. तसेच करारात ठरले होते. मात्र मार्च अखेर पैसे भरण्यास कारखाना व विकसकाने टाळाटाळ केली. सुमारे 28 कोटी रुपये कारखान्याकडून येणे होते. ही रक्कम मार्च अखेरीस वसुल न झाल्याने बॅँकेच्य नफ्यावरही परिणाम झाला. बँकेने वारंवार तगादा लावूनही कारखान्याने पैसे भरले नाहीत. त्यामुळे आता जिल्हा बॅँकेने कारखान्यावर कायदेशीर कारवाई सुरु केली आहे.