सांगली; पुढारी वृत्तसेवा : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेनुसार महापालिका क्षेत्रात दि. 11 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत 'हर घर तिरंगा' अभियान प्रभावीपणे राबविले जाणार आहे. या अभियानात नागरिकांच्या व्यापक व उत्स्फूर्त सहभागासाठी प्रभावी प्रचार, प्रसिद्धी करण्यात येणार आहे.
आयुक्त नितीन कापडणीस यांनी शुक्रवारी महापालिकेत अधिकार्यांची बैठक घेतली. अतिरिक्त आयुक्त खोसे, उपायुक्त राहुल रोकडे, उपायुक्त चंद्रकांत आडके, सहायक आयुक्त तसेच सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.
नागरिकांच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात. क्रांतिकारकांच्या आठवणी, देशभक्तीची भावना कायम रहावी, या उद्देशाने केंद्र, राज्य शासनातर्फे दि. 11 ते 17 ऑगस्ट या कालावधीत 'हर घर तिरंगा'हे अभियान राबविण्यात येणार आहे. महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, खासगी आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्थांनी त्यांच्या इमारतीवर तसेच नागरिकांनी स्वत:च्या घरावर स्वयंस्फूर्तीने ध्वज संहितेचे पालन करून राष्ट्रध्वज उभारायचा आहे.
हे अभियान यशस्वी व्हावे यासाठी महापालिकेतर्फे प्रभावी प्रचार व प्रसारासाठी विविध उपक्रम राबविण्याचा निर्णय झाला. हर घर तिरंगा अभियानासाठी ध्वज उपलब्ध करण्यासाठी नियोजन करण्यात आले.