सांगली

सांगली : बगॅसमध्ये गुदमरून कामगाराचा मृत्यू

Arun Patil

सांगली ; पुढारी वृत्तसेवा : बगॅसच्या ढिगार्‍याखाली गुदमरून वसीम शब्बीर शिराळे (वय 24, रा. औरवाड, ता. शिरोळ, जिल्हा कोल्हापूर) या कामगाराचा मृत्यू झाला. दत्त इंडिया कंपनीने चालविण्यास घेतलेल्या येथील वसंतदादा साखर कारखान्यात हा प्रकार दि. 26 डिसेंबर रोजी घडला आहे. याबाबत रविवारी संजयनगर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी ट्रक चालक वसीम याचा भाऊ तुफेल शब्बीर शिराळे (वय 24, रा. औरवाड, ता. शिरोळ) या संशयिता विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले, बगॅस विक्रीचा ठेकेदाराला मिळालेला आहे. त्यांच्याकडे वसीम हा विविध कामे करीत होता. त्याशिवाय त्याचा भाऊ तुफेल हा सुद्धा ट्रक चालक म्हणून काम करतो. दि. 26 डिसेंबर रोजी रात्री तुफेल हा बगॅस भरण्यासाठी ट्रक ट्रक (एम.एच. 9 एफ.एल. 1558) घेऊन कारखान्यात गेला होता. ट्रक मागे घेत असताना त्या ठिकाणी वसीम हा थांबलेला होता.

तो ट्रक मागे घेण्याबाबत तुफेलाला सुचना करीत होता. तुफेलचा ट्रकवरील ताबा सुटल्याने तो जोरदार पाठीमागे आला आणि बगॅसच्या ढिगाला धडकला. त्यामुळे बगॅसचा ढीग वसीम याच्या अंगावर कोसळला. त्यानंतर कामगारांच्या सहाय्याने वसीमला बाहेर काढून येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान डॉक्टरांनी तपासणी केली असता त्यांनी वसीमचा गुदमरून मृत्यू झाला असल्याचे सांगितले. त्यानंतर वसीम याचा केवळ मृत्यू झाला असल्याची नोंद झाली होती. तुफेल विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला आहे.

SCROLL FOR NEXT