सांगली

सांगली प्रा. शिक्षक बँक निवडणुक : धडा कोणाला शिकवायचा हे सभासद ठरवणार : रमेश मगदूम

मोहन कारंडे

सांगली; पुढारी वृत्तसेवा : प्राथमिक शिक्षक बँकेचे सत्ताधारी पेन्शन हक्क संघटन व अमोल शिंदे यांच्यावर केवळ विनाआधार, बालिश टीका करत आहेत. शिंदे यांनी शिक्षकांच्या प्रश्नांबाबत केलेले काम व जुनी पेन्शन योजना लागू होण्यासाठी केलेले प्रयत्न जिल्ह्यात शिक्षकांनी पाहिले आहेत. त्यांनी पाठिंबा दिल्याने सत्ताधार्‍यांचा पराभव निश्चितपणे होईल, असा विश्वास तालुकाध्यक्ष रमेश मगदूम यांनी केला.

ते म्हणाले, स्वाभिमानी प्राथमिक शिक्षक मंडळाचा जाहीरनामा व सक्षम उमेदवार यामुळे विरोधक सैरभैर झाले आहेत. प्रामाणिक व्यक्तींवरील टीका सुज्ञ सभासद सहन करत नाहीत. विरोधकांच्या टीकेला सभासदच उत्तर देतील आणि दि. 5 जुलैरोजी निकालातून ते स्पष्ट होईल. बँकेचे कामकाज, धोरण, सभासदहिताच्या संदर्भाने भूमिका मांडणे अपेक्षित असताना अदखलपात्र अशा अवगुणी माणसांना उभा करून शिंदे यांच्यावर बिनबुडाचे आरोप करून सभासदांचे लक्ष विचलित करण्याचा कुटील डाव विरोधक खेळत आहेत. मात्र सभासद त्यांच्या उद्देशाला भीक घालणार नाहीत. व्याजदर कमी करण्यात आलेले अपयश, दिलेला शब्द डावलून केलेली कर्मचारी भरती, शंभर टक्के वसुली शक्य असताना कोट्यवधींची थकबाकी, संगणक खरेदी – दुरुस्ती ते फर्निचरवर अवाजवी खर्च करून केलेली मनमानी यासह अनेक मुद्यांवर सभासदांत नाराजी आहे. सर्वसामान्य सभासदांचे प्रतिनिधित्व करण्याच्या उद्देशाने व त्यांना न्याय देण्याची भूमिका पेन्शन हक्क संघटन व अमोल शिंदे यांनी घेतल्याने सत्ताधार्‍यांत पोटशूळ उठला आहे. ऑडिट रिपोर्ट आधारे सत्ताधार्‍यांचा कारभार चव्हाट्यावर आणल्याने सभासद सत्ताधार्‍यांना जाब विचारत आहेत.

ते म्हणाले, बँकेची निवडणूक मुद्द्यांच्या आधारे लढणे सत्ताधार्‍यांना शक्य राहिलेले नाही. म्हणूनच जातीपातीचा मुद्दा पुढे आणून पुरोगामीत्वाच्या नावाखाली आपण किती प्रतिगामी विचाराचे आहोत, हे सत्ताधारी दाखवून देत आहेत. निवडणुकीसाठी पैसा वापरला जातो व त्या आधारेच निवडणूक जिंकता येतात, हा गैरसमज सभासद दूर करतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT