इस्लामपूर ः पुढारी वृत्तसेवा : पोलिसांना बातम्या देत असल्याच्या रागातून तरुणावर चाकू, लाकडी दांडक्याने खुनी हल्ला केल्याचा प्रकार ताकारी येथे शुक्रवारी सायंकाळी घडला. या हल्ल्यात प्रदीप वीरसिंग जाधव (वय 20, रा. तुपारी, गोसावी वसाहत, ता. पलूस) हा गंभीर जखमी झाला आहे.
या खुनी हल्ल्याप्रकरणी पाचजणांवर इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जखमी प्रदीप याची आई सुवर्णा यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विक्रांत बापू क्षीरसागर, प्रतीक जगन्नाथ क्षीरसागर, आशिष उत्तम कांबळे, अक्षय जगन्नाथ क्षीरसागर (सर्व रा. ताकारी) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. तर एकजणाची ओळख पटलेली नाही.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, प्रदीप हा शुक्रवारी सायंकाळी कामानिमित्त ताकारी येथील एस.टी. स्टँड परिसरात आला होेता. त्यावेळी विक्रांत याने प्रदीप याची कॉलर धरली. 'तू पोलिसांना आमच्याबद्दल खोट्या बातम्या देवून आम्हाला अडकवितोस. मी कोण आहे, तुला माहीत आहे काय? तुला ठारच मारतो', असे म्हणून त्याने कंबरेला खोवलेला चाकू बाहेर काढला. चाकूने प्रदीप याच्या डोक्यात वार केले. आशिष याने काठ्यांनी मारहाण केली. तर इतर संशयितांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.