सांगली; पुढारी वृत्तसेवा : दैनिक 'पुढारी' माध्यम समूह व महाराष्ट्र राज्य कृषी विभाग सांगली यांच्यातर्फे आयोजित पुढारी अॅग्रीपंढरी प्रात्यक्षिक कृषी प्रदर्शनास शेतकर्यांतून मोठा प्रतिसाद मिळत आहे. 'पुढारी' कृषी प्रदर्शनाचे शेतकर्यांना अप्रूप वाटत असल्याचेच चित्र शनिवारी अधोरेखित झाले. शेतीतील नवीन तंत्रांचा खजिना खुला करणार्या या प्रदर्शनातून शेतकर्यांना अत्यंत प्रभावीपणे अत्याधुनिक तंत्र अवगत होऊ लागले आहे.
सांगलीत विजयनगर येथे सुरू असलेल्या या प्रदर्शनास शेतकरी वर्गातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. शेतकरी या ठिकाणच्या विविध कंपन्यांच्या स्टॉल्सला भेट देऊन नवनवीन तंत्रांची माहिती घेत आहेत. शेतीसाठी कार्य करत असलेल्या कृषी तंत्रज्ञान क्षेत्रातील विविध कंपन्या आणि शेतकरी यांच्यातील दुवा म्हणून दै. 'पुढारी' प्रात्यक्षिक कृषी प्रदर्शनातून पार पाडत आहे. 'पुढारी' माध्यम समूह व महाराष्ट्र राज्य कृषी विभाग सांगली यांच्यातर्फे पुढारी अॅग्रीपंढरी प्रात्यक्षिक कृषी प्रदर्शन सुरू झाले आहे.
विजयनगर-सांगली येथील जिल्हाधिकारी कार्यालयामागे जिल्हा कृषी विभागाच्या मैदानावर या प्रदर्शनाचा माहोल सजला आहे. ऑर्बिट क्रॉप मायक्रो न्यूट्रियंटस् हे मुख्य प्रायोजक, तर रॉनिक स्मार्ट आणि आरसीएफ हे सहप्रायोजक आहेत. तसेच सिनर्जी मल्टिस्पेशालिटी हे या प्रदर्शनाचे हेल्थ प्रायोजक आहेत. चाळीस एकरहून जास्त जागेवर हे प्रदर्शन सुरू आहे. यामध्ये देश-परदेशातील तीसपेक्षा अधिक पिकांची प्रत्यक्ष लागवड प्रात्यक्षिक शेतकर्यांना पाहायला मिळत आहे. या अभिनव अशाच उपक्रमास प्रयोगशील शेतकर्यांतून मोठा प्रतिसाद मिळत आहे. तसेच यानिमित्ताने विकसित केलेली, भरघोस उत्पादन देणारी विविध पिके, नवनवीन संकरित वाण, भाजीपाला, फुलवर्गीय पिके यांची इत्थंभूत माहिती शेतकर्यांना मिळत आहे. याला शेतकर्यांतून प्रतिसाददेखील मिळत आहे.
वैशिष्ट्य म्हणजे, या प्रदर्शनात दोनशेहून अधिक कंपन्यांचा सहभाग राहिला आहे. प्रामुख्याने खते, बी- बियाणे, कीटकनाशके, बुरशीनाशके, सेंद्रिय उत्पादने, सोलर पंप, मोटार पंप, ट्रॅक्टर-अवजारे यांची प्रात्यक्षिके, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, धान्य निवडक यंत्रे, अत्याधुनिक कृषी अवजारे, मल्चिंग पेपर, शेडनेट, पाईप आदी विविध स्टॉल्स आहेत. त्याचप्रमाणे पारंपरिक शेतीसोबत मत्स्यपालन, कुक्कुटपालन याचे मार्गदर्शक स्टॉल्स आहेत. मत्स्यपालन प्रात्यक्षिकात विविध प्रकारच्या प्रजाती प्रदर्शनात पाहायला मिळत आहेत. सध्याच्या काळात गरजेच्या ठरत असलेल्या कुक्कुटपालन, हॅचरीजपासून ते पोल्ट्री व्यवसायापर्यंत सर्व ती माहिती मिळणार आहे.
विशेष देश-परदेशातील तीसवर पिकांसह प्रदर्शन घेऊन 'पुढारी'ने कृषी क्षेत्रात नवी क्रांती केली आहे. यामधून शेतकर्यांना पिके कोणती घ्यावीत, खते कोणती, बियाणे आणि पिकांच्या जाती कोणत्या, त्याचे उत्पादन कसे जास्त घेता येऊ शकते, हे अवगत होऊ लागले आहे. खासकरून धान्य निवड यंत्रे, अत्याधुनिक पीकअंतर्गत अवजारे, मल्चिंग पेपर, शेडनेट, पाईप, खते, बी-बियाणे, कीटकनाशके, बुरशीनाशके, सेंद्रिय उत्पादने, सोलर पंप, मोटार पंप, ट्रॅक्टर-अवजारे यांची प्रात्यक्षिके, ठिबक सिंचन, तुषार सिंचन अशा विविध प्रकारच्या स्टॉल्सवर गर्दी होत आहे.
पुढारी अॅग्रीपंढरी प्रात्यक्षिक कृषी प्रदर्शन मंगळवार, 7 मार्चपर्यंत सर्वांसाठी मोफत खुले आहे. याचा शेतकर्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन दै. 'पुढारी'च्या वतीने करण्यात आले आहे.
शेतातील माती आणि पाणी पिकांना वापरण्यायोग्य आहे की नाही, तसेच त्यासाठी कोणत्या खतांची, सूक्ष्म खतांची गरज आहे, याची माहिती मिळणे गरजेचे आहे. यासाठी शेतातील माती, पाणी याची मोफत तपासणी ऑर्बिट लॅबोरेटरीजकडून करून देण्यात येत आहे.