सांगली

सांगली: पावसाळ्यात विद्युत यंत्रणेचा वाढता धोका

मोनिका क्षीरसागर

सांगली;पुढारी वृत्तसेवा: वादळ वारा वा पावसामुळे वीजतारांवर झाड वा झाडांची फांदी तुटून पडणे, वीज तारा तुटणे, वीज खांब वाकणे वा पडणे, रोहित्र पडणे असे प्रकार घडतात. त्यामुळे विजेच्या तारांखाली, वीज खांब, रोहित्राजवळ थांबणे टाळावे. विजेच्या तारा, वीज खांब, स्टे वायर, वितरण रोहित्र आदीसह विद्युत यंत्रणेतील कोणत्याही उपकरणांना स्पर्श करणे धोकादायक ठरू शकते. तेव्हा नागरिकांनी विद्युत यंत्रणेपासून सावध राहावे. त्याबाबत महावितरणच्या नजिकच्या कार्यालयास त्वरित सूचना द्यावी.

पाऊस चालू असतांना विजेचा पंप चालू अथवा बंद करणे टाळावे. जनावरे, गुरे ढोरे विजेच्या खांबास, तारास तसेच खांबाजवळ वा तारेखाली असलेल्या झाडाला बांधू नये. पाणी हे वीज सुवाहक आहे. आपल्या घरातील स्विच बोर्ड विजेची उपकरणे पावसाच्या पाण्याशी किंवा ओलाव्यासी संपर्कात येणार नाहीत, याची विशेष काळजी घ्यावी. विद्युत उपकरणे हाताळतांना पायात रबरी चप्पल किंवा बूट घालावा. एखाद्याला विजेचा धक्का बसल्यास त्या व्यक्तिला स्पर्श न करता त्याला कोरड्या लाकडाने बाजूला करावे, त्वरित कृत्रीम श्वास देत रुग्णालयात घेऊन जावे.

विद्युत वितरण रोहित्र, वीज खांबास वा खांबाला ताण देण्यासाठी वापरलेल्या तारेला स्पर्श करू नये. तुटलेल्या विद्युत तारेला स्पर्श करू नये. विद्युत उपकरणांसाठी थ्री-पिनचा वापर करावा. वीज जोडणी क्षमतेपेक्षा अधिक भाराची उपकरणे वापरू नये. ठिकठिकाणी जोड देण्यात आलेल्या वायर्स वापरू नये. घरात पाण्याचे विद्युत मोटारीची हाताळणी जपून करावी. फ्रिज, कुलर, मिक्सर इस्त्री, गिझर, टेबल फॅन इ. विद्युत उपकरणे वापरताना सावधगिरी बाळगावी ती सुस्थितीत असल्याची खात्री करावी.

वाहनाच्या टपावर वा मालवाहू ट्रक वा ट्रॅक्टरवर बसल्यानंतर रस्ता क्रासिंग करणार्‍या विद्युततारांना स्पर्श होऊ शकतो त्याबाबत दक्ष रहावे. शेतात ओल्या हाताने मोटार चालु वा बंद करू नये. वीजेची उपकरणे ओल्या हातानी चालू वा बंद करू नये. बांधकाम करताना शेजारून गेलेल्या विद्युत तारेपासून सुरक्षित अंतर राखावे. बांधकामाची सळई हाताळताना ती विद्युत तारेला स्पर्श होण्याचा धोका असतो. त्यादृष्टीनेच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून विद्युत मांडणीची आर्थिंग सुस्थितीत ठेवावी, ती वेळोवळी तपासून घ्यावी. विद्युत मांडणीकरीता अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर बसविणे गरजेचे आहे.

आपातकालीन स्थितीत शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांसाठी महावितरणचे मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राचे 1912 किंवा 1800-102-3435 किंवा 1800-233-3435 हे टोल फ्री क्रमांक 24 तास उपलब्ध आहेत. यासह मोबाईल अ‍ॅपवर वीजग्राहक तक्रार दाखल करू शकतात. महावितरणकडे नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावरून महावितरणच्या 022-41078500 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यास वीजपुरवठा खंडितची तक्रार नोंदविली जाईल.

SCROLL FOR NEXT