सांगली  
सांगली

सांगली : पाच अधिकार्‍यांना परत पाठविणार

Shambhuraj Pachindre

सांगली : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेकडील अतिरिक्त आयुक्तांसह पाच अधिकार्‍यांना शासनाकडे परत पाठविण्याचा ठराव लवकरच शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने महापालिकेत गतीने हालचाल सुरू आहे. शुक्रवारी ठरावावर अखेरचा 'शिक्कामोर्तब' होईल व लगेचच हा ठराव शासनाकडे पाठविण्यात येईल, असे सांगण्यात आले.

कामात हयगय, कामचुकारपणा, अनावश्यक शेरे तसेच महापालिकेला गरज नसताना शासनाकडून अधिकार्‍यांच्या होत असलेल्या प्रतिनियुक्त्या यावरून गेल्या महासभेत जोरदार चर्चा झाली होती. सहायक आयुक्त तथा महापालिकेच्या विद्युत विभागाचे प्रमुख अशोक कुंभार, अंतर्गत लेखापरीक्षक डवरी यांना शासनाकडे परत पाठविण्याचा आदेश महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी महासभेत प्रशासनाला दिले होते. दरम्यान, अन्य काही अधिकार्‍यांबाबतही निर्णय घेऊन त्यांनाही परत पाठविण्याबाबतची कार्यवाही होईल, असेही सूर्यवंशी यांनी सांगितले होते.

दोनपैकी एक अतिरिक्त आयुक्त

महानगरपालिकेकडे सध्या दोन अतिरिक्त आयुक्त कार्यरत आहेत. एकच अतिरिक्त पुरेत, दुसरे अतिरिक्त आयुक्त शासनाकडे परत पाठविण्यात येणार आहे. अतिरिक्त आयुक्त खोसे, सहायक आयुक्त कुंभार, मुख्य लेखापरीक्षक धनवे, अंतर्गत लेखापरीक्षक डवरी यांना परत पाठविण्याचा ठराव दोन दिवसात शासनाकडे जाईल, असे महापौर सूर्यवंशी यांनी सांगितले. महापौर व आयुक्त यांच्याशी शहर अभियंता संजय देसाई यांचे सख्य नव्हते. बैठकीला अनुपस्थितीच्या कारणाखाली देसाई यांचा कार्यभार काढला होता. कार्यभार काढण्याच्या अधिकारावरून देसाई यांनी आक्षेप घेतला होता.

कुपवाडमधील 'त्या' कामाला तीन पक्षांच्या पाठपुराव्याने निधी मंजूर; निधी एकत्र होणार

कुपवाडमध्ये बौद्ध समाज मंदिरासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपच्या पाठपुराव्यामुळे अनुक्रमे 20 लाख, 22 लाख आणि 20 लाख इतका निधी मंजूर झाला आहे. त्यापैकी एका कामाचे टेंडर झाले आहे. मात्र तीनही निधी एकत्र करून समाजमंदिराचे मोठे काम करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महापौरांच्या दालनात त्यासंदर्भात बैठक झाली. महापौर दिग्विजय सूर्यवंशी, उपमहापौर उमेश पाटील, सभागृह नेते विनायक सिंहासने, विरोधी पक्षनेते संजय मेंढे, राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान व नगरसेवक उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT