सांगली

सांगली : पन्नास वर्षांनी 16 एकर जागेला लागले महापालिकेचे नाव

Shambhuraj Pachindre

सांगली : पुढारी वृत्तसेवा

येथील हनुमाननगरमधील ऑक्सिडेशन पॉण्ड परिसरातील 16 एकर 3 गुंठे जागेला तब्बल 50 वर्षांनी महानगरपालिकेचे नाव लागले आहे. महानगरपालिकेच्या अपीलवर प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी याबाबतचा आदेश दिला आहे. बाजारभावानुसार या जागेची किंमत 60 कोटी रुपये आहे.

महानगरपालिकेचे अनेक ओपन स्पेस, जागा महापालिकेच्या नावावर लागलेल्या नाहीत. अशा जागांचा शोध घेऊन नाव लावण्यासाठी आयुक्त नितीन कापडणीस यांनी निवृत्त नायब तहसीलदार शेखर परब यांची मालमत्ता विभागाकडे विशेष कार्यअधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. परब यांनी अनेक जागा महापालिकेच्या नावावर लावून घेण्यात यश मिळविले आहे.

हनुमाननर येथील 16 एकर 3 गुंठे जागा सन 1967 मध्ये मूळ मालक शंकर सटाले, रामू देवकर, छबुताई कांबळे यांच्याकडून तत्कालीन सांगली नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी खरेदी केली होती. या खरेदीपत्राच्या नोंदी सन 1969 मध्ये झाल्या होत्या. जागेच्या मूळ मालकांना जमीन खरेदीचे पैसे दिले होते. जागेला नगरपालिकेचे नाव लागले होते. मात्र तत्कालीन तहसीलदार यांनी सांगली नगरपालिका ही शेतकरी असल्याचा पुरावा नाही म्हणून नोंद रद्द करून महाराष्ट्र शासनाचे नाव लावण्याचे आदेश दिले होते. कुळ कायदा कलम 63 चा भंग झाल्याचे गृहित धरून कार्यवाही केली होती.

या जागेला तत्कालीन नगरपालिकेने तसेच महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर महापालिकेने नाव लावून घेण्यासाठी बरेच प्रयत्न केले होते. मात्र यश आले नव्हते. शेखर परब यांना कायद्यातील तरतुदी व कायद्यातील बारकावे माहीत होते. त्यानुसार त्यांनी प्रांताधिकारी समीर शिंगटे यांच्याकडे अपील अर्ज दाखल करून सुनावणीवेळी युक्तीवाद केला.

'नगरपालिका ही स्वायत्त व शासन अनुदानित संस्था असल्याने त्यास कुळकायदा कलम 63 ची अट लागू होत नाही. वाद मिळकत नगरपालिकेने खरेदी केलेली मालमत्ता असून व त्यावर खरेदीपासून त्याची कब्जे वहीवाट असल्याने त्यांची मालकी कुळ कायदा कलम 84 (क) अन्वये संपुष्टात आणणे योग्य होणार नाही. त्यामुळे महानगरपालिका अपील अर्ज मान्य करण्यात येत आहे. या जागेवर महानगरपालिकेचे नाव लावावे', असा आदेश प्रांताधिकारी शिंगटे यांनी दिला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT