सांगली

सांगली : नोकरी देण्याच्या आमिषाने लाखोचा गंडा

अमृता चौगुले

सांगली; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या आरोग्य विभागात नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार चव्हाट्यावर आला. महापालिका अधिकार्‍यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला आहे. बिसूरच्या तिघांची फसवणूक झाली आहे. याबाबत सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी तुषार शिवशरण (रा. डीमार्ट मागे, पोळ मळा, सांगली) या संशयितास अटक केली असल्याचे तपास अधिकारी सहायक निरीक्षक प्रशांत निशाणदार यांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की बिसूर येथील तीन तरुण महापालिकेत लिपिक, शिपाई या पदावर रुजू होण्यासाठी आज सकाळी आले. यातीनही तरुणांकडे महापालिकेच्या आरोग्य विभागात रुजू करून घेण्याचे नियुक्ती पत्र होते. उपायुक्त राहूल रोकडे यांची बोगस सही असलेले हे पत्र होते. हे तीन तरुण औषध निर्माण विभागातील अष्टेकर व गोंजारी यांच्याकडे आले. त्यांनी कामावर हजर करून घेण्याचे नियुक्ती पत्र दाखवले. महापालिकेच्या अधिकार्‍यांना या आदेशाबाबत शंका आली. उपायुक्त रोकडे यांची बोगस सही असल्याचे निदर्शनास येताच या तरुणांना घेऊन अष्टेकर व गोंजारी हे कामगार अधिकारी अनिल चव्हाण यांच्याकडे आले. तिथे पुन्हा शहानिशा करण्यात आली. यावेळी या तरुणांना गंडा घातल्याचे समोर आले.

दरम्यान, आयुक्त नितीन कापडणीस यांनी तरुणांची भेट घेतली. त्यानंतर आयुक्तांनी पोलिस अधीक्षक दीक्षीत गेडाम यांच्याशी या बोगस नियुक्ती पत्रासंदर्भात दूरध्वनीवर चर्चा केली. महापालिकेचे अधिकारी व तीन तरुणांनी अधिक्षक गेडाम यांचीही भेट घेतली. गेडाम यांनी ग्रामीण पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांशी संपर्क साधून तरुणांची फिर्याद दाखल करून घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार रात्री उशिरा या तरुणांनी तुषार शिवशरण याच्याविरूद्ध फसवणुकीची तक्रार दिली. पोलिसांनी माहिती काढून शिवशरण याला याला ताब्यात घेतले. त्याने फसवणूक केल्याचा संशय असल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. . सहायक निरीक्षक प्रशांत निशाणदार अधिक तपास करीत आहेत.

SCROLL FOR NEXT