सांगली

सांगली : निवडणूक गावची अन् पेरणी झेडपीची!

दिनेश चोरगे

सांगली; विवेक दाभोळे :  टोकाच्या व्यक्ती द्वेषाचे राजकारण, पराकोटीची गटबाजी याला खतपाणी घालत असलेल्या वारणा काठच्या गावागावांत ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. यानिमित्ताने ग्रामीण राजकारणाला वेग आणि कलाटणी देणाऱ्या गावगाड्यातील निवडणूक प्रचाराचा चांगलाच धुरळा उडू लागला आहे. आरोप प्रत्यारोपांच्या वावटळी भिरभिरू लागल्या आहेत. अर्थात निवडणूक गावची असली तरी यातून अनेकांनी यानिमित्ताने जिल्हा परिषदेसाठीची पेरणी सुरू केली आहे. प्रामुख्याने वारणा काठच्या अनेक गावात है। चित्र अधिकच गडद होऊ लागले आहे.

गावात आपलेच राजकीय वर्चस्व कायम ठेवण्यासाठी, पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी गावागावातील नेतेमंडळी पळून खेळू लागले आहेत. अनेकांनी आपापल्या गॉडफादरना यासाठी साकडे घातले आहे. वारणा भागात प्रामुख्याने बागणी, शिगाव, बहादूरवाडी, कोरेगाव आदी भागात माजी मंत्री जयंत पाटील समर्थकांचे मोठे प्राबल्य आहे. मात्र या ताकदीला टोकाच्या राजकीय गटबाजीचे ग्रहण लागले आहे. यातूनच अनेकवेळा या भागात जिल्हा परिषदेला, पंचायत समितीला राष्ट्रवादीच्या उमेदवाराला बॅकफूटवर यावे लागले होते. या भागातून विधानसभेला आमदार जयंत पाटील यांना भरभरून मतदान होते. मात्र, स्थानिक स्वराज्य निवडणुकीत मात्र जयंत पाटील यांच्या समर्थक उमेदवाराला पिछाडीवर यावे लागते कसे याचे कोडे भल्याभल्यांना उलगडत नाही.

उमेदवार निश्चितीपर्यंत अनेकांची ढवळाढवळ ..

दरम्यान, आमदार जयंत पाटील यांच्या पाठबळावर अनेकांना या भागातून जिल्हा, तालुका पातळीवर कामाची संधी मिळाली. यातूनच अनेकांच्या आशा आकांक्षांना चांगलेच धुमारे फुटल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यातूनच आता अनेकांनी जिल्हा परिषदेचे मैदान डोळ्यासमोर ठेवून राजकीय डावपेच सुरू केले आहेत. अगदी प्रभागातील उमेदवार निश्चितीसाठीपर्यंत अनेकांची ढवळाढवळ वाढली आहे. यातूनच नकळतपणे गटबाजीलाच खतपाणी मिळू लागले आहे. परिणामी गावागावात आपोआपच या खेळीला प्रत्युत्तर म्हणून शहाला काटशहाचे राजकारण करून संघटित शह देण्याचे प्रयत्न होऊ लागले आहेत. वारणाकाठच्या एका गावातील ग्रामपंचायत निवडणुकीत तर अशा ढवळाढवळीची जोरदार चर्चा होत आहे. यातून संतप्त झालेल्या दुसऱ्या गटातील अनेकांनी थेट नेतृत्वासमोर याबाबत तिखट शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केल्याची चर्चा भागात आहे.

डावास डाव..!

दरम्यान, या भागातील अनेक गावात स्थानिक निवडणुकीत बाहेरगावच्या अनेकांची वाढती ढवळाढवळ लोकांच्या नजरेत येऊ लागली आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी जोरदार तयारी करण्यासाठी ग्रामपंचायतीची निवडणूक वेठीस धरून आपली वहिवाट सुरू ठेवण्याच्या अशा अनेकांच्या खेळ्यांना काटशह देण्यात स्थानिक राजकारणाची नस आणि नस माहिती असलेल्यांनी देखील डावास डाव देण्याच्या हालचाली आतापासूनच सुरू केल्या आहेत. यातूनच या साऱ्याच भागातील राजकारण आता निश्चितपणे वेगळ्या वाटेने जाऊ लागले असल्याची प्रतिक्रिया उमटू लागली आहे.

बाहुबलींनीही थोपटले दंड

दरम्यान, या साऱ्याच वातावरणाचा आता अनेक बड्या इच्छुकांनी घेत आतापासूनच जिल्हा परिषदेच्या मैदानासाठी उठाबशा काढायला सुरुवात केली आहे. या इच्छुकांच्या तयारीची मोठी चर्चा होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT