सांगली

सांगली : ‘नायक’ गळाला…‘टोळी’ मोकाट; बँक अधिकारी, शिक्षक कंपनीचे एजंट

दिनेश चोरगे

सांगली; सचिन लाड :  मिलिंद गाडवे…पाच वर्षांपूर्वी गाडीत पेट्रोल टाकण्यासाठी 20 रुपये उसने मागत फिरणारा; पण आज कोट्याधीश आहे. जिल्ह्यातील अनेक गुंतवणूकदारांना त्याने सहाशे कोटींचा गंडा घातल्याची माहिती समोर येत आहे. बँक आणि शिक्षकांना घसघसशीत कमिशनचे आमिष दाखवून त्यांना एजंट म्हणून त्याने नेमले.

दुबईत गुंतवणूक

गाडवे जरी गळाला लागला असला तरी त्याच्या टोळ्यातील एजटांचे काय? ते कसे मोकाट आहेत? आर्थिक गुन्हे शाखा त्यांना आरोपी करणार काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सांगली, कोल्हापूर, सातारा व पुणे या चार जिल्ह्यांत कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून मिळविलेल्या पैशातून त्याने दुबईत मालमत्ता खरेदी केल्याची माहिती पोलिसांना लागली आहे.

'लॉकडाऊन'मध्ये नारळ फोडला

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दि. 19 मार्च 2019 रोजी 'लॉकडाऊन' सुरू झाला. अनेकांच्या नोकर्‍या गेल्या. हाताला कामही मिळत नव्हते. जगायचे कसे, असा लोकांना प्रश्न पडला होता. नेमकं त्याचवेळी गाडवेने 'एस. एम. ग्लोबल' शेअर मार्केट या खासगी कंपनीची स्थापना केली. सांगली, तासगाव, विटा येथे अलिशान कार्यालये थाटली. बँकेतील अधिकारी व काही शिक्षकांना त्याने हाताशी धरले.

बँक अधिकार्‍यांना धरले

बँकेत अनेकांनी शेअर्स, तसेच मुदत ठेवसाठी पैशाची गुंतवणूक केलेली असते. याच गुंतवणूकदारांना कंपनीचे ग्राहक करण्याचे गाडवेला सुचले. यासाठी त्याने बँकेतील अधिकारी तसेच काही शिक्षकांना घसघसशीत कमिशनचे गाजर व भेटवस्तूचे आमिष दाखविले. त्यांची सांगलीत बैठक घेतली. अधिकार्‍यांकडून बँकेतून मोठ-मोठी रक्कम गुंतवणूक केलेल्या ग्राहकांची यादी मागवून घेतली. या ग्राहकांना बँकेतून रक्कम काढून आपल्या कंपनीत गुंतवणूक करण्यासाठी त्याने मार्गदर्शन केले.

जादा व्याजाचे आमिष

बँकेत वर्षाला आठ ते नऊ टक्के व्याज दिले जाते. कंपनीमार्फत महिन्याला दहा टक्के दिले जाईल. या बदल्यात तुम्हालाही 25 टक्के कमिशन दिले जाईल, असे आमिष दाखविले. त्यामुळे बँकेतील अनेक बड्या अधिकार्‍यांनी ग्राहकांचे प्रबोधन करून त्यांना बँकेतील रक्कम काढून ग्लोबलमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. काही शिक्षकांनी त्यांच्या शाळेतील शिक्षकांना कंपनीत गुंतवणूक करण्यास सांगितले.

चारशे ग्रॅम सोने मोफत

वर्षाला दामदुप्पट… गुंतवणूक रकमेला महिन्याला दहा टक्के व्याज… एक कोटीची गुंतवणूक केल्यास चारशे ग्रॅम सोने मोफत…दोन कोटीची गुंतवणूक केल्यास फ्लॅट भेट…अशा अनेक भूलथापा मारून त्याने फसवणुकीचे जाळे टाकले. दोन-चार महिने त्याने दिलेल्या आमिषाचा शब्द पाळला. विश्वास संपादन केल्यामुळे गुंतवणूकदारांनीही मोठ्या प्रमाणात रक्कम गुंतविली. प्रत्यक्षात परतावा, सोने, व्याज यातील काही न मिळाल्याने गुंतवणूकदार सावध झाले. त्यांनी पैसे परत देण्याची मागणी केली. त्यावेळी गाडवेने सांगलीतील गाशा गुंडाळून पलायन केले.

दुबई गाठली

गुंतवणूकदारांचा ससेमिरा टाळण्यासाठी गाडवेने दुबईला पलायन केले. कोट्यवधी रुपयांची मालमत्ता खरेदी केली. सांगलीतील सामाजिक कार्यकर्ते विज्ञान माने यांनी पोलिसांना तो दुबईला पळून जाईल, त्याच्यावर लक्ष ठेवा, अशी मागणी केली होती; पण पोलिसांनी या मागणीकडे दुर्लक्ष
केले.

जिल्ह्यात सहाशेे कोटी रुपयांचा गंडा

सांगली, मिरजेसह जिल्ह्यातील बाराशेहून अधिक गुंतवणूकदारांनी करोडो रुपयांची गुंतवणूक केली असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. गाडवेने जवळपास पाचशे कोटी रुपयांचा गंडा घातल्याचाही अंदाज आहे. पोलिस ठाण्यात तक्रार दिली तर पैसे मिळणार नाहीत, असे त्याने धमकावले असल्याने गुंतवणूकदार अजूनही तक्रार देण्यास पुढे येईना झाले आहेत.
राजकीय आश्रय, पोलिसांचा वरदहस्त
गाडवेला एका राजकीय पक्षाचा आश्रय मिळाला. या पक्षाच्या जोरावर गाडवेने पोलिसांचा वरदहस्त मिळविला. गुंतवणूकदार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास गेला तर त्याची तक्रार घेतली जात नव्हती. त्यामुळे गाडवेचे लोकांना गंडा घालण्याचे धाडस वाढत गेले. राजकीय आश्रयाच्या जोरावरच त्याने बाहेरील जिल्ह्यातही फसवणुकीचे जाळे टाकले.

सांगलीवाडीत एजंटाची आत्महत्या

सांगलीवाडीतील एक तरुण गाडवेच्या कंपनीत एजंट म्हणून काम करीत होता. त्याने नातेवाईकांना गळ घालून रक्कम गुंतवणूक करण्यास सांगितले. दोन महिने त्यांना गाडवेने परतावा दिला. पण त्यानंतर तो टाळाटाळ करू लागला. नातेवाईकांनी त्या एजंटाकडे पैशासाठी तगादा लावला. गाडवेनीही हात वर केले. शेवटी त्या एजंटाने आत्महत्या केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT