सांगली

सांगली : नशीबाने संपवले…यंत्रणेने हरवले!

दिनेश चोरगे

बुधगाव; सचिन सुतार : बुधगाव पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी अविनाश बाबू कांबळे हा आठ वर्षांपूर्वी टाकीवरून पडून गंभीर जखमी झाला. मात्र ग्रामपंचायतीचा तो कायम कर्मचारी नसल्याने सहा महिन्यांपासून त्याचे मानधन बंद केले आहे. परिणामी जायबंदी अविनाशच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. आता तर अविनाश अंथरुणाला खिळून आहे. पैशाअभावी औषध-पाण्यासाठी त्याची परवड सुरू आहे. लालफितीच्या कारभारातून या कुटुंबाला न्याय मिळावा, यासाठी लोकांची मागणी आहे.

अविनाश हा बुधगाव ग्रामपंचायत मध्ये 1 एप्रिल 2000 पासून पाणी पुरवठा विभागात काम करत होता. टाकीतील पाण्याची पातळी पाहणे, गावच्या पाणी पुरवठ्याचे नियोजन करणे हे कौशल्य त्याला अवगत होते. दि. 30 डिसेंबर 2015 रोजी कामावर असताना तो टाकीवरून चाळीस फुटावरून खाली पडला आणि येथूनच त्याचे दैव फिरले. यात त्याचा मणका आणि कंबरेच्या हाडांचा चुरा झाला. उपचारालाही मर्यादा आल्या. तत्कालीन ग्रामपंचायत पदाधिकारी आणि प्रशासनाने शक्य ती मदत केली. मात्र अविनाश कायमचा जायबंदी झाला. त्याला जागेवरून उठता येत नसल्याने प्रपंचाचा खर्च वडिलांच्या पेन्शनवर कसाबसा भागवण्याची वेळ आली. कामावर असताना अपघात झाल्याने मानधन देणे ग्रामपंचायतीला क्रमप्राप्त होते.

सहा महिन्यांपूर्वी ग्रामपंचायतीत सत्ताबदल झाला आणि मिळणारे तुटपुंजे मानधन बंद झाले. गेल्या सहा महिन्यांपासून त्याची पत्नी ग्रामपंचायतीमध्ये हेलपाटे मारत आहे. मात्र कोणीच दाद देत नसल्याचे चित्र आहे. जिल्हा परिषद कर्मचारी आकृतीबंधानुसार 15 वर्षे ग्रामपंचायतीमध्ये काम करणार्‍या अविनाशचे 2014 आणि 15 च्या सेवाज्येष्ठता यादीत नाव आहे. मात्र दप्तर दिरंगाईमुळे त्याला नियुक्ती पत्र मिळाले नाही. वेळेत नियुक्ती पत्र मिळाले असते तर त्याला शासकीय लाभ मिळाला असता. अनुकंपा तत्वावर घरातील व्यक्ती शासकीय सेवेत सामावून घेता आली असती. मात्र तसे झाले नाही.

आता तर त्याला जागेवरून उठता येत नसल्याने त्याचा औषध उपचारासाठी होणारा खर्च, कुटुंबाचा चरितार्थ, दोन वर्षांच्या मुलीचे पालनपोषण यासाठी सार्‍या कुटुंबाची तारेवरची कसरत होत आहे. वडील बाबू कांबळे यांची पेन्शन आणि चार-सहा महिन्यातून एकदा ग्रामपंचायतमधून मिळणारे मानधन हेच काय ते उत्पनाचे साधन. कामावर असताना अपघात झाल्याने पत्नी विद्या यांना अनुकंपा तत्वावर घ्यावे यासाठी ग्रामपंचायतकडे पाठपुरावा सुरू होता मात्र ते देखील झाले नाही.

पत्नीला सेवेत घेतल्यास वाताहत थांबेल

कुटुंबाच्या रोजीरोटीचे साधन म्हणून त्याच्या पत्नीला ग्रामपंचायत प्रशासनाने सेवेत घेतल्यास कांबळे परिवाराची वाताहत थांबेल. यासाठी ग्रामपंचायत स्तरावर निर्णय घेणे शक्य आहे. विद्या कांबळे यांना कामावर घेण्याचा ठराव सप्टेंबरमध्ये मासिक सभेत झाला. मात्र तेथेही राजकारण आडवे आल्याची चर्चा होत आहे. यामुळे आता यंत्रणेकडून हरत असलेल्या कांबळे कुटुंबाने न्याय मागायचा कोणाकडे, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहेे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT