सांगली; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या स्थायी समितीत निवड झालेल्या आठ सदस्यांचा लिखित ठराव रखडला आहे. त्यामुळे सभापती निवडणुकीसाठीचा प्रस्ताव अद्याप महापालिका प्रशासनाकडून पुणे विभागीय आयुक्तांकडे सादर झालेला नाही. परिणामी स्थायी समितीच्या नवीन सभापतींची प्रतिष्ठापना श्रीगणेशाच्या विसर्जनानंतर होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
महापालिकेच्या स्थायी समितीतील 8 सदस्य दि. 1 सप्टेंबर 2022 रोजी निवृत्त होत आहेत. स्थायी समिती सभापतींचा एक वर्षाचा कार्यकालही दि. 31 ऑगस्ट रोजी संपत आहे. स्थायी समितीतील आठ सदस्यांच्या रिक्त होणार्या जागेवर दि. 18 ऑगस्ट रोजीच्या महासभेत नवीन निवडी झाल्या आहेत. स्थायी समितीतील नवीन सदस्य निवड तसेच नवीन सभापती निवडीच्या अनुषंगाने महापालिका प्रशासनाकडून पुणे विभागीय आयुक्तांना प्रस्ताव सादर होतो. मात्र स्थायी समितीतील नवीन सदस्य निवडीचा लिखित ठराव रखडला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून पुणे विभागीय आयुक्तांना अद्याप प्रस्ताव सादर होऊ शकला नाही. परिणामी नवीन सभापतींची प्रतिष्ठापना श्रीगणेशाच्या विसर्जनानंतर होईल, असे संकेत मिळत आहेत.
स्थायी समितीत एकूण सदस्य संख्या 16 आहे. यामध्ये भाजपचे 9, काँग्रेसचे 4 व राष्ट्रवादीचे 3 सदस्य आहेत. स्थायी समितीत भाजपचे वर्चस्व आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भाजपचेच सभापती होणार हे स्पष्ट दिसत आहे. मात्र काँग्रेसने भाजपमधील संभाव्य नाराजांच्या भरोशावर सभापती निवडणुकीत रंगत आणण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
भाजपकडून सभापतीपदासाठी धीरज सूर्यवंशी, अॅड. स्वाती शिंदे, गजानन आलदर, संजय कुलकर्णी हे इच्छुकांच्या यादीत आहेत. भाजपकडून सभापतीपदासाठी उमेदवारी कोणाला मिळणार, याकडे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे लक्ष लागले आहे. काँग्रेसकडून स्थायी समिती सभापतीपदाच्या उमेदवारीसाठी पुन्हा एकदा फिरोज पठाण यांचे नाव पुढे येत आहे.