सांगली

सांगली : धीरज सूर्यवंशी – अतुल माने यांच्यात हाणामारी

अनुराधा कोरवी

सांगली : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेत शुक्रवारी स्थायी समितीचे सभापती व भाजप युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष धीरज सूर्यवंशी आणि भाजपचे शहर जिल्हा सचिव अतुल माने यांच्यात शुक्रवारी फ्री स्टाईल हाणामारी झाली. चैत्रबन नाला बांधकामाच्या १० कोटींची निविदा भरण्यावरून हा राडा झाल्याचे समजते.

शहर पोलिस ठाण्यासमोर महापालिकेत हा प्रकार घडला. या हाणामारीनंतर परिसरात तरुणांची मोठी गर्दी झाली. मोठा तणाव निर्माण झाला. सांगलीत प्रभाग क्रमांक ९ मधील चैत्रबन नाला ते आरवाडे पार्क नाल्याच्या बांधकामासाठी महापालिकेने ई-निविदा पद्धतीनुसार ऑनलाईन निविदा मागविल्या आहेत. नाल्याच्या बांधकामाची अंदाजपत्रकीय रक्कम १० कोटी रुपये इतकी आहे. दरम्यान निविदेसाठी जीओ टॅगिंगची अट महापालिकेने घातलेली आहे.

ठेकेदाराने जीओ टॅगिंग केल्यानंतर महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रमाणपत्र घेऊन कागदपत्रांसोबत ऑनलाईन सादर करायचे आहे. भाजपचे शहर जिल्हा सचिव अतुल माने यांनी या कामासाठी निविदा भरण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. दरम्यान या कामासाठी निविदा भरण्यावरून स्थायी समितीचे सभापती धीरज सूर्यवंशी व अतुल माने यांच्यात दूरध्वनीवरून काहीतरी वाद झाला आणि या वादाचे पर्यवसन महापालिका कॅन्टिनजवळील वाहनतळाजवळ फ्रीस्टाईल हाणामारीमध्ये झाले. त्याची चर्चा महापालिका वर्तुळात जोरदार सुरू झाली.

सूर्यवंशी व माने हे दोन्ही युवा नेते भाजपचे पदाधिकारी आहेत. त्यांच्यात झालेल्या हाणामारीचे वृत्त सर्वत्र पसरले. महापालिकेसमोरच शहर पोलिस ठाणे आहे. पोलिसांनी तातडीने धाव घेतली. अतुल माने यांना शहर पोलिस ठाण्यात नेले. तोपर्यंत महापालिका व शहर पोलिस ठाणे परिसरात सूर्यवंशी समर्थकांची मोठी गर्दी झाली होती. मोठा तणाव निर्माण झाला होता. पोलिसांना माने यांना शहर पोलिस ठाण्यातच थांबवून घेतले. आवारात जमलेल्या गर्दीला पांगवले.

वाद पोलिस ठाण्यापर्यंत… तक्रार नाही

महापालिकेतील हा वाद शहर पोलिस ठाण्यापर्यंत गेला. अतुल माने व धीरज सूर्यवंशी हे दोन्ही गट पोलिस ठाण्यात गेल्याने तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. दोन्ही गटाने परस्परविरूद्ध तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला. मात्र अचानक त्यांनी पोलिसांना आमची काही तक्रार नाही. आम्ही आपापसात मिटव. असे सांगन ते पोलिस ठाण्यातन निघन गेले.

टक्केवारीची चर्चा ऐरणीवर

निविदा भरण्यावरून भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या हाणामारीमुळे महापालिकेतील विकास कामांमधील टक्केवारीची चर्चा पुन्हा ऐरणीवर आली आहे. निविदेतील अटी, शर्ती चर्चेत आल्या आहेत. हा प्रकार महापालिका क्षेत्रातील राजकीय वर्तुळातही जोरदार चर्चेत आला आहे.

काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्षांची मध्यस्थी

धीरज सूर्यवंशी व अतुल माने यांच्यात हाणामारी सुरू असताना काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मनोज सरगर तिथे होते. मनोज सरगर व अमर निंबाळकर यांनी सूर्यवंशी व माने यांना बाजूला केले. तोपर्यंत पोलिस घटनास्थळी पोहोचले. दरम्यान परिसरात मनोज सरगर समर्थक तरुणांचीही मोठी गर्दी झाली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT