सांगली; पुढारी वृत्तसेवा: सांगली, मिरज शहरासह जिल्ह्यात शनिवारी दिवसभर रिमझिम पाऊस सुरू होता. धरण पाणालोट क्षेत्रात अद्यापही मध्यम पाऊस कोसळत आहे. सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी सकाळी 18.10 फूट झाली होती. मात्र, सायंकाळी पाणीपातळी 19 फुटावर गेली होती. पाणीपातळीत दिवसभर चढउतार होत होता. वारणा नदीतील पाणीपातळी काही प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे तूर्तास तरी नदीकाठच्या ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात पुढील चार-दिवस काही भागात मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
सांगलीत दिवसभर अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. सूर्यदर्शनही होत होते. रिमझिम पावसाने सर्वत्र दलदल झाली आहे. भाजी मंडई, बसस्थानक परिसरासह उपनगरामध्ये चिखल झाला आहे. परिणामी नागरिकांना या मार्गावरून चालताना कसरत करावी लागत आहे. तसेच शिराळा, वाळवा, कडेगाव, मिरज, खानापूर, कवठेमहांकाळ तालुक्यांसह ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.
गेल्या आठ-दहा दिवसांपासून धरण परिसरात कोसळणारा मुसळधार पाऊस थोडासा कमी झाला आहे. मागील 24 तासात म्हणजे शुक्रवारी सकाळी आठ वाजल्यापासून ते शनिवारी सकाळी आठवाजेपर्यंत कोयना परिसरात 53 तर शनिवारी दिवसभरात 41 मि.मी. पाऊस पडला. महाबळेश्वर येथेही वरीलप्रमाणे अनुुक्रमे 178 व 7 मि.मी. पावसाची नोंद झाली. नवजाला 162 व 46 मि.मी. पाऊस कोसळला. धोम येथे 15 व 7, कण्हेरला 30 व 9 तर चांदोलीत 90 व 14 मि.मी. पाऊस पडला. यामुळे धरणांत पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. कोयनेत प्रतिसेंकद अंदाजे 55 हजार 279 क्युसेक पाणी येत आहे.
धोम, कण्हेरमध्ये 3 हजार 850 तर चांदोलीत 16,663 क्युसेक पाणी येत आहे. कोयना धरण सध्या 53 टीएमसी भरले आहे. या धरणातून 2100 क्युसेक पाणी सोडणे कायम आहे. धोम धरण 7 टीएमसी भरले आहे. कण्हेरमध्ये 5 टीएमसी साठा झाला आहे. चांदोली धरण 24 टीएमसी भरले आहे. या धरणातून 1761 क्युसेक पाणी प्रतिसेंकद वारणा सोडले जात आहे. दरम्यान, कर्नाटकातील अलमट्टी धरण 87.9 9 टीएमसी भरले आहे. या धरणात महाराष्ट्रातून एक लाख 29 हजार 872 क्युसेक पाणी जात आहे. तर या धरणातून पुढे एक लाख 50 हजार क्युसेक पाणी सोडले जात आहे.
धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे कृष्णा, वारणा नद्यांची पाणीपाळी कमी होत आहे. सांगलीत आयर्विन पुलाजवळ शुक्रवारी सायंकाळी 19.5 फूट असणारी पातळी शनिवारी सायंकाळी 19 फूट झाली होती. विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात धोका पातळी फुटामध्ये पुढीलप्रमाणे : भिलवडी -20.4 (53), आयर्विन-सांगली -19 (45), अंकली पूल हरिपूर- 24.9 (45.11).
जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 6.7 मि.मी. पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. शिराळा तालुक्यात 22.4 मि.मी. असा सर्वाधिक पाऊस पडला आहे. जिल्ह्यात मागील 24 तासांत पडलेला पाऊस व कंसात 1 जूनपासून आतापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी.मध्ये पुढीलप्रमाणे. : मिरज-5.7 (148.1), जत- 0.7 (127.8), खानापूर-विटा- 6.6 (146.6), वाळवा-इस्लामपूर – 8.6 (198.2), तासगाव- 5.0(132.5), शिराळा- 22.4 (494.2), आटपाडी -0.6 (92.6), कवठेमहांकाळ -3.9 (128.8), पलूस- 3.0 (119.4), कडेगाव- 8.9 (158).
धरण पाऊस (24 तास+आजचा दिवस) क्षमता(टीएमसी) साठा(टीएमसी) विसर्ग(क्युसेक)
कोयना 53+41 मि.मी. 105.25 53.53 2100
चांदोली 90+14 34.40 24.18 1761
धोम 15+7 13.50 7.38 000
कण्हेर 30+9 10.10 5.37 00
नवजा 162+46 000 000 000
महाबळेश्वर 178+7 000 000 000
अलमट्टी 123 87.99 150000
तालुका गेल्या 24 तासांतील पाऊस एक जूनपासून आजपर्यंत
शिराळा 22.4 494.2
वाळवा 8.6 198.2
पलूस 3.0 119.4
कडेगाव 8.9 158
तासगाव 5.0 132.5
खानापूर 6.6 146.6
आटपाडी 0.6 92.6
क.महा. 3.9 128.8
जत 0.7 127.8
मिरज 5.7 148.1