इस्लामपूर : पुढारी वृत्तसेवा
भोंगा हा काय विषय चर्चेचा आहे का? गॅस सिलिंडर हजारच्यावर गेला, पेट्रोल 122 रुपयांपर्यंत पोहोचले. या देशात खरा प्रश्न पोटाचा आहे, असे प्रतिपादन गृहनिर्माण आणि अल्पसंख्याक विकासमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले. येथील ईदगाह मैदान व शादीखान्याच्या अडीच कोटी रुपयांच्या कामाच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. जलसंपदामंत्री जयंत पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ प्रामुख्याने उपस्थित होते. या कामाचा पाठपुरावा केल्याबद्दल माजी नगरसेवक पीरअली पुणेकर, ईदगाह मैदान शेजारची जमीन दिल्याबद्दल आदिनाथ चौधरी यांचा सत्कार करण्यात आला.
ना. आव्हाड म्हणाले, दोन्ही समाज अतिशय सामंजस्याने वागले. त्यामुळे त्यांना अपेक्षित असे काहीच झाले नाही. तो सदावर्ते म्हणतो, गांधीने देशाचे वाटोळे केले आणि नथुराम गोडसेचा 'जी' असा उल्लेख करतो. तो कोणत्या विचारांची भाषा बोलतो, तो कोणाचा हस्तक आहे, हे लक्षात येते. ना. मुश्रीफ म्हणाले, गेल्या काही महिन्यांपासून आपल्या समाजाला उचकविण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, आपण संयमाची भूमिका घ्यायला हवी. ना. पाटील म्हणाले, ज्यांना परत सत्तेत येण्याचा विश्वास नाही, ते आपल्या राजकीय हितासाठी जातीय तणाव वाढवित आहेत.
यावेळी माजी नगराध्यक्ष मुनीर पटवेकर, भगवान पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शहाजी पाटील, प्रा. डॉ. सूरज चौगुले, अॅड. चिमण डांगे, मुख्याधिकारी वैभव साबळे, बाळासाहेब पाटील, विजयराव पाटील, खंडेराव जाधव, विश्वनाथ डांगे, शकील जमादार यांच्यासह मुस्लिम समाजातील कार्यकर्ते उपस्थित होते.