सांगली : पुढारी वृत्तसेवा
करिअरबाबत पालकांनी विद्यार्थ्यांवर मते लादू नयेत. आवडीचे क्षेत्र निवडून करिअरला सुरुवात करावी. दिशा योग्य असेल तर दशा होत नाही. जीवन जगत असताना दुसर्याला आवडेल ते कराल तर प्रॉडक्ट म्हणून जगाल. स्वत:ला आवडेल ते कराल तर ब्रँड म्हणून जगाल, असे प्रतिपादन संजय घोडावत युनिव्हर्सिटी कोल्हापूरचे विश्वस्त विनायक भोसले यांनी केले.
'पुढारी एज्युदिशा-2022' या शैक्षणिक प्रदर्शनात विनायक भोसले यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन केले.काही गोष्टी, उदाहरणांचा वापर करून विद्यार्थ्यांवर सकारात्मक विचार बिंबवले. न्यूनगंड बाजूला ठेवून स्वत:ची आवड, स्वत:चे शक्तीस्थळ ओळखून मार्गक्रमण केले तर आपण स्वत:ला घडवू शकतो, असा विश्वास दिला.
भोसले म्हणाले, विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीने ध्येय निवडावे. ध्येय निवडल्यानंतर त्यावर चांगल्या पद्धतीने काम केले पाहिजे. एखादे अपयश आले तर ध्येय बदलता कामा नये. उलट सकारात्मक विचार ठेवून अधिक प्रयत्न केले तर निश्चितपणे ध्येय गाठता येते. नकारात्मक विचार हा जीवनाला लागलेला गंज आहे. तो काढला पाहिजे. विद्यार्थ्यांनी करिअर निवडताना शैक्षणिक संस्थेच्या कॅम्पसला भेट दिली पाहिजे. शिक्षकांशी संवाद साधला पाहिजे. 'करिअर'संदर्भात अभ्यास केला पाहिजे. निवडलेल्या क्षेत्रातील करिअरच्या संधी समजून घेतल्या पाहिजे.
पालकांनी मुलांमधील चांगले गुण शोधले पाहिजेत. कौन्सिलिंग केले पाहिजे. मुलांमधील चांगल्या गुणांचे कौतुक केले पाहिजे. मुलांनीही आपल्या आवडीनिवडी व्यक्त केल्या पाहिजेत. आवडीचे क्षेत्र निवडून ते गाठण्यासाठी परिश्रम महत्त्वाचे आहेत. जीवनात चढ-उतार येत असतात. त्यांना सामोरे गेले पाहिजे. शिस्त, सतत विद्यार्थी होऊन ज्ञान ग्रहण करत राहणे, योग्य वेळी निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. स्पर्धेच्या युगात आनंदी जीवन महत्त्वाचे आहे. योगा, खेळ, मेडिटेशन गरजेचे आहे. शरीर प्रकृतीबाबत दक्ष असणे गरजेचे आहे
ते म्हणाले, संजय घोडावत विद्यापीठात करिअर गायडन्सची सुविधा उपलब्ध केलेली आहे. तिथे भेट दिल्यावर करिअरची संधी समजावून घ्या. करिअर निवडायला मदत केली जाईल. विद्यापीठातर्फे कोल्हापूर व सांगलीत करिअर मार्गदर्शन केंद्र चालू केले जाईल.