सांगली

सांगली : ‘त्या’ परप्रांतीय मुलींना केले गायब!

मोहन कारंडे

सांगली; सचिन लाड : पोलिस कारवाईचा ससेमिरा टाळण्यासाठी सांगलीत 'रेडलाईट' एरियातील परप्रांतीय मुलींना दलाल व एजंटांनी रातोरात गायब केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली. या मुलींना पुणे व मुंबईला रवानगी करण्यात आली आहे. विश्रामबाग पोलिस मात्र या प्रकाराबाबत अनभिज्ञ आहेत.

कर्नाटकातील तस्करी बंद!

सांगली, मिरजेत कर्नाटकातील मुलींची वेश्या व्यवसायासाठी तस्करी व्हायची. मात्र गेल्या दहा वर्षात ही परिस्थिती बदलली आहे. तेथील मुलींना वेश्या व्यवसायात ढकलू नये, याबद्दल काही सामाजिक संघटनांनी प्रबोधन केल्याने पालकांमध्ये खूप बदल झाला. त्यांनी मुलींना वेश्या व्यवसायात न आणता शिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे तेथील मुलींची तस्करी पूर्णपणे बंद झाली आहे. ज्या जुन्या महिला आहेत, त्याच आता इथे व्यवसाय करीत आहेत.

परप्रांतीय मुलींचा शोध!

कर्नाटकातील मुलींची तस्करी बंद झाल्यानंतर दलाल महिला व एजंटांनी परप्रांतीय मुलींना येथे वेश्या व्यवसायासाठी आणण्याचे ठरविले. मुंबई व पुण्यातील एजंटांशी संपर्कात राहून गेल्या दहा ते बारा वर्षांपासून नेपाळ, बांग्लादेश, पश्चिम बंगाल व राजस्थानमधील मुलींची तस्करी सुरू केली. सांगलीत सध्या प्रेमनगर व गोकूळनगरमध्ये या मुली मोठ्या प्रमाणात दिसतात.

पोलिसांचे अभय कशासाठी?

परप्रांतीय मुलींची तस्करी करताना त्यांचे फोटो, पासपोटर्र् या सर्व बाबींची पूर्तता केली तरच त्यांना भारतात आणता येते. पण एजंट व दलालांकडून त्याची कोणतीही अंमलबजावणी केली जात नसल्याची माहिती मिळाली आहे. अनाधिकृतपणे खासगी वाहनांतून या मुलींना भरून तस्करी केली जात आहे. हा सारा कारभार रात्रीचा सुरू असतो. सांगलीत पोलिसांना हाताशी धरून बेकायदा कुंटणखाना चालवून मुलींकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जातो. पोलिसही कशासाठी त्यांना अभय देत आहेत, असा प्रश्न उपस्थित होतो.

कोळीचा पाठीराखा कोण?

विश्रामबाग पोलिस ठाण्यातील हवालदार स्वप्निल कोळी याने प्रेमनगरमध्ये कुंटणखाना चालविणार्‍या महिलेस 'तू अल्पवयीन मुलीकडून वेश्या व्यवसाय करून घेत आहेस', अशी तंबी देऊन आतापर्यंत तिच्याकडून सात लाखांची खंडणी वसूल केल्याचा गुन्हा दाखल झाला. खंडणी वसूल करण्याबरोबर त्याने या मुलींवर दोन वेळा बलात्कार केला. सामाजिक संघटनांच्या तक्रारीमुळे या प्रकरणाला वाचा फुटली. कोळीला अटक झाली. मुलीची सुटका झाली. पण कोळीचा पाठीराखा कोण आहे? त्याची चौकशी होणार का? त्याच्यावर कारवाई होणार का? हे अजूनही गुलदस्त्यातच आहे.

मुली रातोरात गायब

कोळीच्या प्रतापामुळे पोलिस दलाची अब्रू वेशीवर टांगली गेली. प्रसारमाध्यमांनीही टिकेची झोड उठविल्यानंतर विश्रामबाग पोलिसांनी तत्परता दाखवित गोकूळनगरध्ये छापा टाकला. दोन राजस्थानी मुलींची सुटका केली. दलाल महिलांना अटक केली, पण तत्पूर्वीच पडद्याआड राहून या व्यवसायाची सूत्रे हलविणार्‍या दलाल व एजंटांनी काही मुलींना रातोतात गायब केले. पोलिस कारवाईचा ससेमिरा टाळण्यासाठी या मुलींची पुणे व मुंबईतील 'रेड लाईट' एरियात रवानगी केली असल्याची माहिती आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT