इस्लामपूर; मारुती पाटील : वाळवा तालुक्यातील बहुतांश तीर्थक्षेत्रावर प्रेमी युगुलांचा बिनधास्त वावर आहे. त्यांना कोणीच अटकाव घालत नल्याने ही तीर्थक्षेत्रे जणू लव्हर्स पाँईटच बनू लागली आहेत. असे प्रकार रोखण्यासाठी असलेले निर्भया पथकही गायब आहे. त्यामुळे भाविकांतून संताप व्यक्त होत आहे.
तालुक्यातील बहे रामलिंग बेट, मल्लिकार्जुन तीर्थक्षेत्र, दत्त टेकडी , मच्छिंद्रनाथगड आदी प्रमुख तीर्थक्षेत्रे तसेच पर्यटनस्थळे आहेत. या ठिकाणी नेहमीच भाविक व पर्यटकांची वर्दळ असते. मात्र अलीकडच्या काही काळात पर्यटकांबरोबरच या ठिकाणांकडे प्रेमी युगुलांचाही ओढा वाढलेला आहे. या परिसरात असलेली दाट झाडी तसेच अडगळीच्या ठिकाणी प्रेमी युगुलांचे चाळे चाललेले असतात. याचा या ठिकाणी येणार्या भाविकांना त्रास होत आहे. तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी प्रेमी युगुले बिनधास्तपणे वावरत असल्याने मंदिरांचे पावित्र्यही धोक्यात आले आहे. त्यामुळे भाविकांच्यातून संताप व्यक्त होत असून पोलिसांनी या युगुलांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. काही प्रेमी युगुलांना एकांतात गाठून लुबाडण्याचे प्रकारही घडले आहेत. यातून काही गंभीर प्रकार घडण्याचीही शक्यता आहे. त्याआधी पोलिसांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे.
मुलींची छेडछाड तसेच सार्वजनिक ठिकाणी चालणारे गैरप्रकार रोखण्यासाठी पोलिसांचे निर्भया पथक कार्यरत आहे. परंतु अलीकडच्या काळात हे पथकही गायब झाले आहे. तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी या पथकाची कधी फेरीही पहायला मिळत नाही. त्यामुळे महिला अधिकार्यांची नेमणूक करुन निर्भया पथक सक्षम करण्याची गरज आहे.