तासगाव विठ्ठल चव्हाण : तासगाव तालुक्यात गेल्या वर्षभरात क्राईम रेटमध्ये वाढ झाली आहे. खून, चोर्या, मारामारी या घटना वाढल्या आहेत. अनेक गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले असले तरी गुन्हेगारी कारवाया थांबताना दिसत नाहीत. तालुक्यात कडक पोलिसिंग राबविण्याची गरज असल्याची मागणी होत आहे.
4 ऑगस्ट रोजी येथील शिवनेरी कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष अनिल जाधव यांच्यावर धारधार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. वास्तविक खून झाला त्या दिवशी तरुणांच्या दोन गटात दोन-तीनवेळा बाचाबाची झाली होती. पोलिसांनी दक्षता घेऊन दोन गटातील वाद मिटविला असता तर कदाचित खुनाची घटना टाळता आली असती, अशा प्रतिक्रिया उमटत आहे. जाधव खून प्रकरणात दोन्ही गटाकडून जाहीरपणे राजकीय पक्षांची नावे घेतली जात असल्याने हा विषय चिंतेचा झाला आहे. खुनातील संशयितांना अटक करावी म्हणून पोलिस ठाण्यावर मोर्चे निघतात यावरून पोलिस राजकीय दबावाखाली असल्याचे दिसून येत आहे. धोत्रे याचा खून हा दोन गटातील वर्चस्व वादातूनच झाला होता. दोन गटातील तरुण गेल्या कित्येक दिवसापासून एकमेकांना खुन्नस देत होते. अखेर त्याची परिणीती खुनात झाली.
शहरात तरुणांच्या गटात वाढ होऊ लागली आहे. एकमेकांना खुन्नस देणे, धमक्या देणे असले प्रकार वाढू लागले आहेत. याला कारण म्हणजे शहरात गांजा, वाळू, मुरूम तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यातून खून, मारामार्या, खुन्नस देणे या प्रकारात वाढ होऊ लागली आहे. आतापर्यंत शांत, संयमी शहराला गालबोट लागले आहे. या प्रकारांना राजकीय पाठबळ मिळत असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. खुनी हल्ले होण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. शहरातील इंदिरा नगर झोपडपट्टीत खुनी हल्याच्या घटना वारंवार होत आहेत. या भागातील बेकारी, व्यसनाधीनता, किरकोळ कारणावरून खुन्नस यामुळे या परिसरातील लोक हैराण झाले आहेत. शहरात भरदिवसा मुख्य रस्त्यावर हिसडा गँगकडून दागिने पळविण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. अनेक प्रकरणे पोलिसांनी उघडकीस आणली असली तरी शहरातील वृद्ध, महिला सुरक्षित नाहीत.