सांगली

सांगली : तरुणांचा मेंदू ‘हायजॅक’ होतोय : मंजुळे

दिनेश चोरगे

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  कविता, साहित्यातून जे मिळते, त्याची किंमत पैशात करता येत नाही. पुस्तकांमुळे जगणे कळायला लागते. सध्या तरुणांचा मेंदू 'हायजॅक' केला जातोय. हे रोखायचे असेल तर तरुणांच्या हाती पुस्तके द्या, असा सल्ला दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी दिला.

सांगली येथील संग्राम हजारे यांच्या 'रिकाम टेकड्याचे आत्मवृत्त' या कविता संग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ कवी व वात्रटिकाकार रामदास फुटाणे, अभिनेते किशोर कदम यांच्याहस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. मंजुळे म्हणाले, कविता, साहित्य लिहिणे सध्या दुर्मीळ होत चालले आहे. चांगल्या समाजासाठी साहित्य आवश्यक आहे. आपल्या समाजात मुलांना पुस्तकांपासून दूर ठेवून त्यांचा मेंदू हायजॅक केला जात आहे. ते थांबवायचे असेल तर मुलांच्या हातात पुस्तके दिली पाहिजेत. मेंदूच्या व्यायामासाठी ग्रंथालये खूप महत्त्वाचे काम करीत असतात. सध्या चांगल्या कविता वाचायला मिळत नाहीत. परंतु खूप काळानंतर हजारे यांच्या चांगल्या कविता वाचायलया मिळाल्या.

साहित्याशी संबंध नसलेल्यांची संमेलनाध्यक्षपदी निवड : फुटाणे

ज्येष्ठ कवी व वात्रटिकाकार रामदास फुटाणे म्हणाले, हजारे यांच्या माध्यमातून सांगलीचा एक अनमोल रत्न महाराष्ट्राला दिला आहे. समाजाला एकसंघ बांधण्याची ताकद ही मराठी साहित्य आणि कवितेत असते. त्यामुळे समाजात जे-जे चांगले ते-ते साहित्याच्या माध्यमातून व्यक्‍त करता आले पाहिजे.

ते म्हणाले, सध्या मराठी साहित्यापासून आपण दूर चाललो आहोत. विशेष म्हणजे साहित्याचा संबंध नसलेल्यांची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी वर्णी लागते, हे दुर्दैव आहे. मराठी हा विषय विद्यापीठात शिकविण्यापुरता आहे. ही वस्तुस्थिती आहे. परंतु, समाजाला एकसंघ बांधण्याची ताकद मराठी साहित्य व कवितेत असते. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात प्रयत्न व्हायला हवेत. साहित्याबाबत परिसंवाद झाले पाहिजेत.

अंधारात असणार्‍यांना नागराज शोधत आहेत : किशोर कदम

अभिनेते किशोर कदम म्हणाले, कविता ही भावनेची गोष्ट सांगत असते. ग्लोबलायझेशनच्या काळात सर्वत्र भावनारहित असे वातावरण आहे. या काळात एक संवेदनशील काव्यसंग्रह येतोय, ही खूप समाधानाची गोष्ट आहे. असे अनेक कवि, साहित्यिक अंधारात आहेत आणि जे-जे अंधारात आहेत, त्यांना भिंग लावून शोधण्याचे काम नागराज मंजुळे यांची टीम करीत आहे. यावेळी दिग्दर्शक उमेश कुलकर्णी, डॉ. संजय चौधरी प्रा. अविनाश सप्रे, संजय साठे यांनी मनोगत व्यक्‍त केले. संदीप फाटक, मिलिंद भागवत, सचिन हंकारे, संजय बनसोडे उपस्थित होते. गार्गी कुलकर्णी यांनी आभार मानले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT