सांगली

सांगली : डॉक्टराला मारहाण; ९ लाखांची खंडणी वसूल, कुपवाड येथील घटना

अमृता चौगुले

कुपवाड; पुढारी वृत्तसेवा : शहरातील विवेकानंद क्लिनिकचे डॉक्टर राजेंद्र आनंदराव यादव (रा. विश्रामबाग, सांगली) यांना दवाखान्यात घुसून दोन तरुणांनी बेदम मारहाण केली. तसेच त्यांच्याकडून 9 लाख 90 हजार रुपयांची खंडणी वसूल केल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. या घटनेची नोंद कुपवाड पोलिसात झाली आहे.

याप्रकरणी गौरांग दीपक माळी (वय 24, रा. बापट मळा, सांगली), जिनय किशोर ठक्कर (वय 21, रा. सांगली) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी : डॉ. राजेंद्र यादव यांचा विवेकानंद क्लिनिक या नावाने दवाखाना आहे. सोमवारी दुपारी ते एकटेच दवाखान्यात बसले होते. यावेळी संशयित दवाखान्यात घुसले. एकाने दवाखान्याचे शटर बंद केले. संशयित माळी याने डॉ. यादव यांना बेदम मारहाण केली. तसेच धमकी देऊन पैशाची मागणी केली. डॉ. यादव यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने त्यांना पुन्हा मारहाण करून त्यांच्या जवळील रोख दोन हजार रुपये काढून घेतले. डॉक्टरांचा मोबाईल घेऊन संशयितांनी तपासणी केली असता त्यांच्या बँक खात्यावर मोठी रक्कम असल्याचे संशयितांना दिसले.

संशयित माळी व ठक्कर यांनी यादव यांना तुमच्या बँक खात्यावरून पैसे काढून देण्याची मागणी केली. डॉक्टरांनी धनादेश देण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी धनादेश न घेता जबरदस्तीने त्यांना त्यांच्या कारमध्ये (एम.एच.10डी.जी.5703) बसवून त्यांना सांगलीत घेऊन गेले.

डॉ. यादव यांना त्यांच्या सांगलीतील बँक खात्यातील 9 लाख 90 हजार रुपये काढायला लावले. सदरचे पैसे संशयितांनी घेऊन डॉक्टराला पुन्हा कुपवाडमध्ये आणून सोडले.'तू आम्हाला महिन्याला वीस हजार रुपये द्यायचे, नाहीतर तुला जिवंत ठेवणार नाही,' अशी धमकी देऊन मोटारसायकलीवरून फरार झाले.

याप्रकरणी डॉ. यादव यांनी संशयित माळी व ठक्कर या दोघांविरोधात कुपवाड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी काही तासांतच दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी गुन्हा कबूल केला आहे. पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यांना न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने संशयितांना तीन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

SCROLL FOR NEXT